भाजपा राज्य कार्यकारिणीत जिल्ह्याला भोपळा

By Admin | Updated: June 12, 2015 02:01 IST2015-06-12T02:01:52+5:302015-06-12T02:01:52+5:30

एक-दोन नव्हे तर तब्बल पाच आमदार देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत चक्क भोपळा

BJP state executive pumps in the district | भाजपा राज्य कार्यकारिणीत जिल्ह्याला भोपळा

भाजपा राज्य कार्यकारिणीत जिल्ह्याला भोपळा

वचनपूर्तीच्या ‘फ्लॉप-शो’चा परिणाम : पाचही आमदार बेदखल, नेतृत्वाचा अभाव, संघटन मंत्र्यांना मात्र बढती
यवतमाळ : एक-दोन नव्हे तर तब्बल पाच आमदार देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत चक्क भोपळा मिळाला आहे. भाजपा नेत्यांमधील गटबाजी आणि निष्क्रीयतेचा हा फटका मानला जात आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. मात्र त्यात यवतमाळ जिल्ह्यातील एकाही आमदार किंवा पदाधिकाऱ्याला स्थान मिळाले नाही. जिल्ह्यात पूर्वी विधानसभेच्या सात पैकी पाच जागा काँग्रेसकडे होत्या. सन २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत या पाचही जागा भाजपाने खेचून आणल्या. ही मोठी उपलब्धी मानली जाते. एकाच झटक्यात पाच जागांचे मिळालेले हे यश पाहता मंत्रीमंडळात यातील कुणाला तरी स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. आता जुलैमध्ये राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. त्यात भाजपाच्या सात मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. परंतु त्यासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्येही यवतमाळ जिल्ह्यातील कुणाचाच समावेश नाही. किमान राज्य कार्यकारिणीत तरी आमदार अथवा अन्य स्थानिक नेत्यांना सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीही पूर्णत: फोल ठरली. जिल्ह्यात एक दलित आणि दोन आदिवासी आमदार आहेत. त्यांना आदिवासी आघाडी, दलित आघाडीत अ‍ॅडजेस्ट केले जाईल, असे बोलले जात होते. मात्र तेथेही त्यांच्या नावांचा विचार झाला नाही. पाच आमदार निवडून येऊनही यवतमाळ जिल्ह्याची प्रदेश भाजपाने कोणतीच दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यवतमाळात वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्हा मुख्यालयाचा हा सोहळा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर्णत: फ्लॉप ठरला. त्यामुळेच येथील आमदार अथवा नेत्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिले गेले नसल्याचे भाजपाच्या गोटात बोलले जाते.
या ‘फ्लॉप शो’ची दखल घेणारे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री रामदास अंबटकर यांना मात्र पक्षाने बढती देऊन प्रदेश सरचिटणीस बनविले आहे. मंत्रीमंडळ, राज्य कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने येथील नेत्यांची हुरहुर वाढली आहे. आता मंडळ-महामंडळावरील नियुत्यांच्या वेळीसुध्दा अशीच ‘फ्लॉप ट्रिटमेंट’ तर मिळणार नाही ना, याची भीती व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

विदर्भातील चार जिल्ह्यांना संधी
४विशेष असे या कार्यकारिणीत विदर्भातील बुलडाणा, भंडारा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना स्थान दिले गेले आहे. यवतमाळला भाजपात सक्षम नेतृत्व नसल्यानेच मुंबईत जिल्ह्याची कुणी दखल घेत नसल्याचे सांगितले जाते. भाजपाच्या जिल्ह्यातील आमदार व नेत्यांना (मंत्रीमंडळ असो अथवा प्रदेश कार्यकारिणी) त्यांची जागा वारंवार दाखविली जात आहे. पक्षस्तरावर सातत्याने हा पराभव वाट्याला येत असूनही जिल्हा भाजपातील गटबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत. नेत्यांच्या या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होतो आहे. म्हणूनच त्यांच्या नावांचा अद्यापही मंडळ-महामंडळ, जिल्हा, तालुका समित्यांवरील नियुक्त्यांसाठी विचार झालेला नाही.

Web Title: BJP state executive pumps in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.