भाजपा-सेना सक्षम उमेदवाराच्या शोधात

By Admin | Updated: October 15, 2016 02:49 IST2016-10-15T02:49:19+5:302016-10-15T02:49:19+5:30

यवतमाळ नगरपरिषदेचे आगामी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने राजकीय

BJP-Sena looking for an able candidate | भाजपा-सेना सक्षम उमेदवाराच्या शोधात

भाजपा-सेना सक्षम उमेदवाराच्या शोधात

यवतमाळ नगराध्यक्ष : काँग्रेसकडे अनेक पर्याय, राष्ट्रवादीतही मोर्चेबांधणी
यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेचे आगामी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. भाजप-सेनेवर तर आधी नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत काँग्रेसकडे सर्व परिचित पर्याय उपलब्ध दिसत आहेत.
यवतमाळचा नगराध्यक्ष होण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविली होती. मात्र महिला आरक्षणाने या मोेर्चेबांधणीला चांगलाच सुरुंग लावला. नगराध्यक्ष होण्याचे सर्वपक्षीय डझनावर नेत्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यांना आता नगरसेवक आणि फारच झाले तर नगर उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारता येणार आहे. कालपर्यंत नगराध्यक्षाच्या शर्यतीत असलेल्या या इच्छुकांपैकी काहींनी आरक्षणानंतर आपल्या सौभाग्यवतींना नगराध्यक्ष बनविण्याची तयारी चालविली आहे. एका माजी नगराध्यक्षाने आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचा पर्याय निवडला असून अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे. पालकमंत्र्याच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासाठी शहरातील इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक कौल देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृत पक्ष प्रवेशाचा सोपस्कार लवकरच पार पडणार आहे.
मुळात काँग्रेसमध्येही नगराध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या महिलांची कमी नाही. काँग्रेसमधील जिल्हा परिषदेच्या एका माजी महिला अध्यक्षाने आपल्या समाजाचे ३५ हजार मतदार यवतमाळ शहरात असल्याचा दावा करीत नगराध्यक्षपदावर काँग्रेसकडून जोरदार दावा सांगितला आहे. याशिवाय एक महिला माजी आमदारही नगराध्यक्ष होण्यास इच्छूक आहे. राष्ट्रवादीकडूनही सामाजिक ओळख असलेल्या एका महिला नेत्याने नगराध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीची ही मोर्चेबांधणी पाहता भाजप-सेनेमध्ये तेवढे सक्षम चेहरे अद्याप पुढे आलेले नाही. सध्या चर्चेत असलेल्या नावांभोवती पक्षातूनच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यामुळेच नेत्यांनाही यवतमाळच्या नगराध्यक्षपदासाठी सक्षम महिला उमेदवाराची शोधमोहीम राबवावी लागत आहे. आमदारकीच्या बरोबरीने हे नगराध्यक्षपद असल्याने राजकीय व सामाजिक समीकरण डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्षांना आपला उमेदवार द्यावा लागणार आहे. हे सक्षम व सर्वपरिचित उमेदवार शोधताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.
यवतमाळ विधानसभा भाजपाकडे असल्याने नगराध्यक्षाच्या माध्यमातून नगरपरिषदही आपल्याच ताब्यात असावी, या दृष्टीने भाजप नेत्यांचे प्रयत्न आहे. मात्र यवतमाळ शहर व लगतच्या आठ ग्रामपंचायतींमध्ये नाम आणि तोंडओळख असलेली सर्वपरिचित सक्षम महिला भाजपाकडे नसल्याने नेत्यांची चिंता वाढली आहे.
शिवसेनेनेसुद्धा माजी नगराध्यक्षाच्या पत्नीसाठी पर्याय खुले ठेवून नगरपरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसमध्ये सक्षम इच्छुकांची गर्दी पाहता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महिलांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. बहुजन समाज पार्टी, एमआयएमकडूनही नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

काँग्रेसने मागविले इच्छुकांचे अर्ज
४जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक आहे. येथील इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसने अर्ज मागविले आहे. १५ ते १९ आॅक्टोबर दरम्यान हे अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा दोनही पदांसाठी इच्छुकांचे अर्ज घेतले जाणार आहे. त्यानंतर या अर्जावरून मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून कमिटीकडून उमेदवारीचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: BJP-Sena looking for an able candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.