भाजपा आमदारावर काँग्रेसच्या ताई ठरल्या भारी

By Admin | Updated: July 11, 2015 00:01 IST2015-07-11T00:01:06+5:302015-07-11T00:01:06+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय बाभूळगावला स्थलांतरित करण्यासाठी भाजपा आमदारांनी मोर्चेबांधणी केली आहे.

BJP MLA congratulated the Congress on the Congress ticket | भाजपा आमदारावर काँग्रेसच्या ताई ठरल्या भारी

भाजपा आमदारावर काँग्रेसच्या ताई ठरल्या भारी

बांधकाम सचिवालयातील घरोबा : यवतमाळचे कार्यालय बाभूळगावला हलविण्यात अडसर
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय बाभूळगावला स्थलांतरित करण्यासाठी भाजपा आमदारांनी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसमधील एका ताईने त्यात आपल्या सचिवस्तरीय हितसंबंधांच्या बळावर अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला यवतमाळात चार उपविभागीय कार्यालये होती. त्यातील क्रमांक-४ चे कार्यालय पाच वर्षांपूर्वी आमदार संजय राठोड यांनी आपल्या मतदार संघात दिग्रसला खेचून नेले. उपविभाग क्रमांक-१ कार्यालयांतर्गत यवतमाळ तालुका समाविष्ट आहे. क्रमांक-२ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय क्षेत्राचा समावेश होतो. तर क्रमांक -३ हे कार्यालय विशेष प्रकल्पांतर्गत असून त्यात यवतमाळातील रिंग रोड-बायपासचा समावेश होतो. ही तीनही कार्यालये यवतमाळातच एकवटली असल्याने यातील क्रमांक २ किंवा ३ यापैकी एक उपविभागीय अभियंता कार्यालय बाभूळगावला हलविण्याचा प्रस्ताव तत्कालीन आमदार प्रा. वसंतराव पुरके यांनी सन २०१३ मध्ये शासनाकडे सादर केला होता. मात्र हे कार्यालय यवतमाळातून हलविले जावू नये म्हणून काही अभियंत्यांचा ‘इंटरेस्ट’ होता. त्यासाठी त्यांनी सोयीच्या कंत्राटदारांना हाताशी धरून त्यावेळी कार्यालय स्थलांतराचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यासाठी दिशाभूलही केली गेली होती.
आता राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन होताच राळेगावचे आमदार प्रा. अशोक उईके यांनी हे उपविभागीय बांधकाम कार्यालय बाभूळगावला हलविण्यासाठी आग्रह धरला आहे. बाभूळगावातील नागरिकांना संबंधित कामांसाठी यवतमाळला यावे लागते, तालुक्याला मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळतो, त्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे, बाभूळगावला काम करणाऱ्या अभियंता-कर्मचाऱ्यांना यवतमाळ ते बाभूळगाव असा टीएडीए द्यावा लागतो, त्यापोटी आस्थापनांवरील अतिरिक्त खर्चाचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडतो, अशी कारणे यासाठी दिली गेली आहे. मात्र हे कार्यालय येथून हलविले जाऊ नये म्हणून अभियंता व कंत्राटदारांच्या एका चौकडीने पुन्हा मोर्चेबांधणी चालविली आहे. त्यासाठी ही चौकडी काँग्रेसमधील एका ताईच्या आश्रयाला गेली. या तार्इंचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या थेट सचिवालयात घरोब्याचे संबंध आहेत. त्या बळावरच त्यांनी काही अभियंत्यांच्या बदलीचे आदेशही आपल्या सोईने फिरवून घेतले. आता बांधकाम कार्यालय बाभूळगावला जावू नये म्हणून या तार्इंनी जणू भाजपा आमदारासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मुळात आमदार अशोक उईके यांचे बांधकाम सचिवालयात तेवढे वजन नाही. कारण उईकेंनी एका उपअभियंत्याला राळेगावात नेमणूक द्यावी म्हणून शिफारस पत्र दिले होते. मात्र त्यांच्या या शिफारस पत्राचा सचिवालयाने विचारच केला नाही. उलट सचिवालयात भाजपा आमदारापेक्षा काँग्रेसमधील ताईची शिफारस वजनी ठरली. तार्इंनी आपल्या मर्जीतील उपअभियंता वाघमारे यांची आमदाराच्या नाकावर टिच्चून राळेगावात नियुक्ती करून घेतली. मुळात वाघमारे हे जिल्हा परिषदेला होते. त्यांची उपविभाग क्रमांक-३ ला वर्षभरापूर्वी बदली झाली होती. मात्र ते तेथे रुजू न होता बरेच दिवस आजारी रजेवर राहिले. त्यानंतर ते तार्इंच्या आश्रयाला गेले. तार्इंनी वाघमारे यांची सुरुवातीला शिवसेनेच्या बालेकिल्यातील नेर उपविभागात पोस्टींग करून घेतली. आपल्या ‘एनओसी’शिवाय तार्इंनी ही आॅर्डर करून आणल्याचे कळताच सेना नेत्यांनी थयथयाट केला. प्रकरण थेट ‘सरकार’पर्यंत नेले गेले. त्यानंतर वाघमारेंची नेरची बदली रद्द करून पुन्हा तार्इंच्या सोईने त्यांना राळेगावला बसविण्यात आले. नेरला शिवसेनेच्या मर्जीतील उपअभियंत्याला खुर्ची देण्यात आली. भाजपा आमदार अशोक उईके यांना कुणकुणही लागू न देता तार्इंनी वाघमारे यांची राळेगावला आॅर्डर करून घेतली, हे विशेष ! भाजपा आमदाराला एखाद्या अभियंत्याची आपल्या मतदारसंघात साधी बदली करता येत नसेल तर उपविभागीय कार्यालय हलविता येईल का, असा कळीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आमदार उईके यांचे भाजपा सरकारमधील वजन उघड झाले आहे. ते पाहता बाभूळगाव तालुक्यातील जनतेने उपविभागीय अभियंता कार्यालय हलविले जाईल याची आस लावून बसण्यात अर्थ नाही, असा सुरही ऐकायला मिळतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP MLA congratulated the Congress on the Congress ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.