महागावात भाजपाला कुबड्याचा आधार
By Admin | Updated: October 12, 2015 02:39 IST2015-10-12T02:39:37+5:302015-10-12T02:39:37+5:30
नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित जुळविण्यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत असताना या निवडणुकीत भाजपाची स्थिती मात्र केविलवाणी झाली आहे.

महागावात भाजपाला कुबड्याचा आधार
नगरपंचायत : निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर, राजकीय वातावरण तापले
महागाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित जुळविण्यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत असताना या निवडणुकीत भाजपाची स्थिती मात्र केविलवाणी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर नऊ महिन्यातच भाजपाची वाताहत सुरू झाली आहे. शिस्तीमध्ये असलेला पक्ष आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला कुबड्याचा आधार घ्यावा लागत आहे.
महागाव नगरपंचायतीसाठी नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. उमेदवारांवर दबाव आणून त्यांना नामांकन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भाजपही यात आघाडीवर दिसत आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपात गेले नसले तरी भाजपाच्या बुडत्या जहाजाला दिशा देण्याचे काम ते पडद्याआड करीत आहे. त्यामुळे भाजपाला नदी पार करण्याचा आनंद वाटत असला तरी भाजपाच्या नावेला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता छिद्र पाडणे सुरू केले आहे.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष अशा सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत दुखावल्या गेले आहे. पक्षात सुरू असलेला तिकिट वाटपाचा खेळ भाजपातील ज्येष्ठ नेत्यांनाही माहीत आहे. खरी गोम ही आहे की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर अल्पकाळात विद्यमान आमदाराने मतदारांची वचनपूर्ती केली नाही. त्याचा आता नगरपंचायत निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. जनतेच्या दारावर मते मागायला जायचे कसे, असा प्रश्न सुरू आहे.
गेल्या १० महिन्यात महागावत कोणतेही विकासाचे काम आणले नाही. निवडणुकीच्या तोंडावर २५ लाख रुपयांची कामे देण्याचा केलेला वादा आणि शहरातील रस्त्यांचे घेतलेले मोजमाप किती खोटारडेपणाचे होते, याची वाच्यता होतानाच आचारसंहिता लागली. आता मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जावे म्हणून भाजपाची सूत्रे पडद्याआड काँग्रेस नेत्याच्या हाती दिली आहे.
विद्यमान आमदारांनी जनसंपर्कही कमी केला आहे. महागाव, फुलसावंगी आणि उमरखेडमधून आमदारांचे घनिष्ठ होते तेही आता दूर झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या काळात विकासाला टक्केवारीचे ग्रहण लागले होते. त्यापलिकडे जावून सध्या अधिक टक्केवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या सर्व बाबींचा परिणाम भाजपाला नगरपंचायत निवडणुकीत सोसावा लागेल, हे कुणाला सांगणे न लागे. (शहर प्रतिनिधी)