सेना वरचढ होण्याची भाजपाला भीती
By Admin | Updated: December 4, 2014 23:15 IST2014-12-04T23:15:23+5:302014-12-04T23:15:23+5:30
जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ

सेना वरचढ होण्याची भाजपाला भीती
मंत्रिपदासाठी लॉबिंग : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
यवतमाळ : जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ होण्याची हूरहूर भाजपा नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच या नेत्यांनी भाजपालाही जिल्ह्यात मंत्रीपद मिळावे म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे मोर्चेबांधणी चालविली आहे.
जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचे एक शिष्टमंडळ सकाळीच नागपूरला रवाना झाले. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ४ ची वेळ भेटीसाठी दिली आहे. त्यानंतर ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा विदर्भातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात जिल्ह्यातील भाजपाच्या तीन आमदारांसह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ आमदार मदन येरावार यांना ५ डिसेंबरच्या विस्तारात मंत्रीपद मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहे. त्याच प्रमाणे येरावार यांचे राजकीय गॉडफादर असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडूनही मंत्रीपदाबाबतचा शब्द मिळविण्याचा या शिष्टमंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
शिवसेना सत्तेत सहभागी होत आहे. सेनेच्या वाट्याला पाच कॅबिनेट व सात राज्यमंत्रीपदे येणार आहेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख संजय राठोड यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे विस्तारात भाजपाच्या वाट्याला केवळ आठ जागा येणार असल्याने आणि इच्छुकांची रांग बरीच मोठी असल्याने जिल्ह्यातून आतापर्यंत निश्चित मानल्या जाणाऱ्या मदन येरावार यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. याची जाणीव झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी मदन येरावार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चेबांधणी चालविली. विशेष असे, या शिष्टमंडळात खुद्द मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मदन येरावार यांचाच समावेश नाही. यावरून येरावार यांनीच हे शिष्टमंडळ पाठविले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. भाजपाचे जिल्ह्यातील अन्य आमदार पहिल्यांदाच निवडून आल्याने ‘तुम्हाला आत्ताच संधी नाही’ असे म्हणून त्यातील तिघांना लॉबिंगसाठी शिष्टमंडळात समाविष्ठ करून घेण्यात आले आहे. विशेष असे, या चार पैकी आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी आपल्याला मंत्रीपद मिळावे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फत जोरदार फिल्डींग लावली आहे. विदर्भातून आदिवासी समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे म्हणून तोडसाम प्रयत्नरत आहेत.
जिल्ह्यात भाजपाला मंत्रीपद न मिळाल्यास पक्षाचे वजन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला न मिळाल्यास सेनेचे जिल्हाभर नेटवर्क निर्माण होईल, प्रशासनावरही सेनेचीच पकड राहील. एक आमदार असूनही सेना वरचढ तर पाच आमदार असूनही भाजपा राजकीयदृष्ट्या मागे फेकली जाण्याची हूरहूर व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे नेटवर्क वाढल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपावर शिवसेना वरचढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच आधार घेऊन भाजपाचे शिष्टमंडळ मदन येरावार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग करीत आहे. मात्र येरावार यांच्यावर पूर्णत: गडकरींचा लागलेला शिक्का, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेला सलोखा, बिल्डर लॉबीशी हितसंबंध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळाला किती गांभीर्याने घेतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)