सूत गिरणी निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष पराभूत

By Admin | Updated: June 20, 2016 02:20 IST2016-06-20T02:20:46+5:302016-06-20T02:20:46+5:30

राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षाचा मात्र बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला.

BJP defeats taluka head in Yuva Mill elections | सूत गिरणी निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष पराभूत

सूत गिरणी निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष पराभूत

२० संचालक अविरोध : राष्ट्रवादीने मारली बाजी
पुसद : राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षाचा मात्र बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. एका जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारीत सूत गिरणीवर आपले वर्चस्व कायम केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २० संचालक अविरोध निवडून आले होते.
सहकार क्षेत्रात अग्रगण्य महागाव तालुक्यातील पिंपळगाव सूत गिरणीच्या एका जागेसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत पुसद भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे यांचा दारूण पराभव झाला. त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आप्पाराव घुक्से यांनी पराभूत केले. भवरे यांना केवळ ८७ मते मिळाली असून त्यांची अनामतही जप्त झाली. तर विजयी उमेदवार घुक्से यांना १ हजार ६४८ मते मिळाली आहे. काँग्रेस, शिवसेना व भाजपा पुरस्कृत सहकार बचाव आघाडीने या निवडणुकीत उडी घेत भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे यांना रिंगणात उतरविले. विशेष म्हणजे यापूर्वी सूत गिरणीच्या २१ संचालकांपैकी २० संचालक अविरोध झाले होते. आमदार मनोहरराव नाईक यांचे या सूत गिरणीवर वर्चस्व आहे. मात्र एका जागेसाठी ही निवडणूक झाली. रविवारी पुसदच्या शेतकरी निवास सभागृहात मतमोजणी झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे आप्पाराव घुक्से विजयी झाले.
भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे हे महागाव तालुक्यातील मोहदीचे रहिवासी असून सध्या पुसदमध्ये वास्तव्यास आहे. या निवडणुकीत त्यांना केवळ ८७ मते मिळाल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपाचा तालुकाध्यक्ष पराभूत झाल्याने आजही पुसदमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे या निवडणुकीने सिद्ध झाले आहे. आता या निवडणुकीचे कवित्व काही दिवस सुरु राहणार आहे. (लोकमत चमू)

Web Title: BJP defeats taluka head in Yuva Mill elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.