भाजपा आमदाराला कागदपत्रे मागितली

By Admin | Updated: July 1, 2015 00:09 IST2015-07-01T00:09:50+5:302015-07-01T00:09:50+5:30

आमदारांना मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागलेले असतानाच उमरखेड आमदाराची कागदपत्रे मुंबईत तपासणीसाठी...

The BJP asked for the documents of the MLA | भाजपा आमदाराला कागदपत्रे मागितली

भाजपा आमदाराला कागदपत्रे मागितली

मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध : उमरखेडला पसंती, यवतमाळला डच्चू !
यवतमाळ : आमदारांना मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागलेले असतानाच उमरखेड आमदाराची कागदपत्रे मुंबईत तपासणीसाठी मागितल्याने भाजपात पुन्हा एकदा राजकीय चहलपहल पहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी या विस्ताराची अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर गेल्याने अधिवेशनापूर्वी विस्ताराची शक्यता कमी आहे. मात्र पक्ष स्तरावर या विस्ताराच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. ते पाहता विस्तार लवकरच होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहे. उमरखेड येथील अनुसूचित जातीसाठी आरक्षित विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार राजेंद्र नजरधने यांची महत्वाची कागदपत्रे व निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्राची प्रत तपासणीसाठी मुंबईत बोलविण्यात आली आहे. त्यामुळे नजरधने यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता बळावली असून उमरखेड-महागाव तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे सात पैकी पाच आमदार आहेत. येथील काँग्रेसची सत्ता उलथविणाऱ्या पाच पैकी कोणत्याही एका आमदाराला मंत्रिमंडळात स्थान द्यावे, ही सुरुवातीपासूनचीच मागणी होती. पाच पैकी चार आमदार नवखे आहेत. त्यामुळे यवतमाळचे अनुभवी आमदार मदन येरावार यांना यावेळी तरी मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा होती. त्या दृष्टीने त्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्गे मोर्चेबांधणीही चालविली होती. मात्र त्यांच्यावर लागलेला विशिष्ट गटाचा शिक्का मंत्रिमंडळ समावेशात अडसर ठरतो की काय अशी भीती त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त केली जात आहे. उमरखेडच्या आमदाराला कागदपत्रांच्या तपासणीसाठी दिलेले प्राधान्य लक्षात घेता यवतमाळला या विस्तारात डच्चू मिळण्याची शक्यताही राजकीय गोटात वर्तविली जात आहे. एखादवेळी नजरधने यांना मंडळ-महामंडळावर घेऊन लालदिवा दिला जाऊ शकतो, असाही सूर आहे. कागदपत्रांच्या तपासणीआड नेमके काय दडले आहे, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

रेल्वेच्या श्रेयावरून भाजपात दोन गट
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला ४० टक्के वाटा अर्थात एक हजार ४२ कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली. या निधीचे संपूर्ण श्रेय आपल्याकडे लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार मदन येरावार यांनी केला होता. त्याचा पुरावा देणारे अनेक बॅनर्स शहरात झळकले. विशेष असे या बॅनरवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा फोटोही गायब असल्याने येरावारांना प्रदेश नेतृत्व मान्य नाही का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात होता. येरावार यांच्या या बॅनरला शह देण्यासाठी भाजपाने पाचही आमदारांचा समावेश असलेले आणखी एक बॅनर तयार केले होते. मात्र त्यातून पक्षांतर्गत गटबाजी आणखी चव्हाट्यावर येण्याची चिन्हे बघता हे बॅनर शहरात लावले गेले नाही. भाजपाचे अन्य चार आमदार व पक्ष पदाधिकाऱ्यांमधील येरावारांप्रती असलेले खदखद यातून दिसून येते.

पालकमंत्री पदही हवे
विस्तारात भाजपाला येथे मंत्रिपद मिळण्याची शक्यता पाहता कार्यकर्त्यांनी आता यवतमाळचे पालकमंत्री पद मिळावे म्हणूनही मोर्चेबांधणी चालविली आहे. संजय राठोड यांना वाशिमची जबाबदारी देऊन भाजपाकडे यवतमाळ जिल्हा द्यावा, असा कार्यकर्त्यांमधील सूर आहे. राठोड यांनी पालकमंत्री पदाआड पक्षबांधणी सुरू केल्याने भाजपा अस्वस्थ आहे.

Web Title: The BJP asked for the documents of the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.