भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सत्तेचा दावा

By Admin | Updated: October 29, 2015 02:54 IST2015-10-29T02:54:15+5:302015-10-29T02:54:15+5:30

नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना, भाजपासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटत आहे.

BJP, Army, Congress, NCP's claim of power | भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सत्तेचा दावा

भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सत्तेचा दावा

कळंब नगर पंचायत : नेते म्हणतात, आमचेच सर्वाधिक नगरसेवक येणार
गजानन अक्कलवार कळंब
कळंब : नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना, भाजपासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटत आहे. विशेष म्हणजे या चारही पक्षाने स्वबळावर सत्तेचा दावा ठोकला आहे. मात्र जनता कोणाच्या हाती सत्ता देणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
एकहाती सत्ता मिळेल - आ. उईके
सत्तेचा दावा करताना ‘लोकमत’शी बोलताना भाजपा आमदार डॉ.अशोक उईके म्हणाले, आम्ही एकहाती सत्ता मिळवित आहो. कमीतकमी नऊ नगरसेवकाच्या भरवशावर भाजपाचा झेंडा फडकेल. २० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी साधी पिण्याच्या पाण्याचीही समस्या सोडविली नाही. हा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडविणार आहो. चिंतामणी मंदिराला ‘अ’ दर्जा देण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडला जाईल. कळंबला मॉडेल शहर बनविण्याचा मानस आहे. अतिक्रमणधारकांना पर्याप्त जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. चक्रवती नदीचे खोलीकरण करून ‘शिरपूर पॅटर्न’ बंधारे बांधून शहराची जलपातळी वाढविली जाईल, असे डॉ.उईके म्हणाले.
११ जागा मिळणार - वसंत पुरके
माजी आमदार प्रा.वसंत पुरके म्हणाले, काँग्रेसचा ११ जागांवर विजय निश्चित आहे. आम्हाला कोणाचाही पाठिंबा घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता निश्चित आहे. पिण्याचे बारमाही शुध्द पाणी पुरविणे हे आमचे ध्येय आहे. प्रशस्त रस्ते, वाचनालय, शैक्षणिक सुविधांकडे जातीने लक्ष दिले जाईल. चिंतामणी मंदिराचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकास हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अतिक्रमण थांबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याकडे लक्ष देण्यात येईल. काँग्रेसकडे सर्वांचा कल होता, म्हणूनच काहींनी बंडखोरी केली. परंतु त्याचा कुठलाही फरक पडणार नाही, असा विश्वास आहे.
सर्व जागा जिंकणार - देशमुख
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी सर्व १७ ही जागांवर विजयाचा दावा केला. पिण्याच्या पाण्याला प्राध्यान्य देण्याचे वचन त्यांनी दिले. शहर स्वच्छ व निटनेटके ठेवण्याठी जनजागृतीला प्राधान्य दिले जाईल. यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊ. अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्याकडे जातीने लक्ष घालू. अद्ययावत शैक्षणिक धोरण आखले जाईल. क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावण्यात येईल. खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल. श्री चिंतामणी मंदिर विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रवीण देशमुख म्हणाले.
स्वबळाचे प्रयत्न - संतोष ढवळे
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा पक्ष निरिक्षक संतोष ढवळे म्हणाले, आमच्या सात ते आठ उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. स्वबळावर सत्ता स्थापण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सत्तेत असणाऱ्यांनी कुठलेही प्रश्न सोडविले नाही. शिवसेनेवर जनतेने विश्वास दाखविला, तर आम्ही बोलून नाही तर करून दाखवू. पिण्याच्या पाण्याची समस्या आम्ही निश्चित सोडविणार. रस्ते, नाल्या, गटारं, अस्वच्छता या समस्या तत्काळ निकाली काढल्या जाईल. केंद्र व राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून जनता आम्हाला साथ देत आहे, असे संतोष ढवळे म्हणाले.
एकंदरीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बहुमतावर सत्तेत येण्याविषयी प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनता कोणावर विश्वास ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: BJP, Army, Congress, NCP's claim of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.