जर्मनीत जन्म, भारतावर प्रेम अन् जगभरात ख्याती !

By Admin | Updated: October 30, 2016 00:11 IST2016-10-30T00:11:57+5:302016-10-30T00:11:57+5:30

यंदा यवतमाळकरांच्या दिवाळीवर आंतरराष्ट्रीय संगीतकाराच्या स्वरांची पखरण होणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रूद्रवीणा वादन ऐकण्याची संधी आली आहे.

Birth in Germany, love of India and world famous! | जर्मनीत जन्म, भारतावर प्रेम अन् जगभरात ख्याती !

जर्मनीत जन्म, भारतावर प्रेम अन् जगभरात ख्याती !

यवतमाळात येतोय अनोखा कलावंत : प्रेरणास्थळावर कासंटीन वीक आणि प्रबल नाथांची मंगळवारी जुगलबंदी
यवतमाळ : यंदा यवतमाळकरांच्या दिवाळीवर आंतरराष्ट्रीय संगीतकाराच्या स्वरांची पखरण होणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रूद्रवीणा वादन ऐकण्याची संधी आली आहे. जर्मनीत जन्मलेले, भारताच्या प्रेमात पडलेले आणि जगभरात ख्याती पावलेले कलावंत कासंटीन वीक यांच्या सुरावटीची जादू ‘प्रेरणास्थळा’वर गुंजणार आहे. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध पखवाजवादक प्रबल नाथ यांची जुगलबंदी रंगणार आहे. अत्यंत दुर्लभ असा हा कार्यक्रम मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजता होत असून यवतमाळातील रसिकांमध्ये त्याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी संगीताचे नि:सीम चाहते होते. त्यांच्या प्रेरणास्थळ या समाधीस्थळी आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त व्यक्तींनी संगीताचे सादरीकरण केले. आता दिवाळीच्या मंगल पहाटेला जर्मनीत जन्मलेले आणि भारतीय संगीतासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे कासंटीन वीक आपली कला सादर करणार आहेत. ते मोजक्या आंतरराष्ट्रीय रूद्रवीणा वादकांपैकी एक आहेत. रूद्रवीणा हे प्राचीन शास्त्रीय तंतूवाद्य असून वीणेचा उल्लेख वेद, उपनिषदातही आढळतो. पौराणिक कथेनुसार, रूद्रवीणेची निर्मिती भगवान शंकराने केली. वीणा हे योगी-संन्याशांचे लोकप्रिय साधन आहे. शांती आणि ब्रह्मानंद यांचा सुरेख अनुभूती रूद्रवीणा श्रवणातून श्रोत्यांना येते. अशी ही रूद्रवीणा ऐकण्याचा योग प्रथमच यवतमाळकरांना यानिमित्ताने येत आहे. कासंटीन वीक यांना यावेळी प्रसिद्ध पखवाज वादक प्रबल नाथ साथसंगत करणार आहेत. रूद्रवीणेवर कासंटीन वीक धृपद आणि विविध राग सादर करणार आहेत. आपल्या जादुई बोटांनी काढलेले वीणेचे झंकार श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रूद्रवीणा वादक कासंटीन वीक
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रूद्रवीणा वादक कासंटीन वीक यांचा जन्म जर्मनीत झाला. बालवयापासूनच त्यांनी संगीत साधनेला प्रारंभ केला. १९९० मध्ये संगीताच्या ओढीने भारतात आले. अनेक संगीतकारांपासून त्यांनी उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला तबलानवाज पंडित अनिंदो चटर्जी यांच्याकडून कोलकात्यात तबल्याचे धडे घेतले. त्यानंतर ते रूद्रवीणा वादनाकडे वळले. रूद्रवीणेचा शास्त्रीय साधना त्यांनी पद्मभूषण उस्ताद असद अली खान यांच्याकडे केली. याचवेळी प्राचीन भारतीय संगीत धृपदाचा वीक यांनी विशेष अभ्यास केला. उस्ताद असद अली खान यांनी वीक यांना खंदारबाणी शैलीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. वीक यांनी भारतीय संगीताला युरोपात पोहोचविण्याचे मोठे कार्य केले आहे. वीक यांचे नवीन वीणेवर संशोधन सुरू असून स्थानिक कारागिरांच्या मदतीने ते रूद्रवीणा विकसित करीत आहेत. आलाप, दगरबाणी धृपद, जोर, झाला यांचा सुरेख संगम आपल्या वादनातून ते सादर करतात. त्यांच्या वादनाला अध्यात्मिक खोली असून मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती श्रोत्यांना ब्राह्मानंदी घेवून जाते. असा हा संगीताचा अद्वितीय अनुभव देणारा कलावंत यवतमाळात आपली कला सादर करीत आहे.

Web Title: Birth in Germany, love of India and world famous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.