कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर
By Admin | Updated: December 3, 2014 22:58 IST2014-12-03T22:58:57+5:302014-12-03T22:58:57+5:30
मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात

कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर
रमेश झिंगरे - बोटोणी
मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हे पीक कर्ज कसे फेडावे, याची चिंता सतावत आहे़ निवडणुकीपूर्वी विविध आश्वासने देणारे पुढारी मात्र आता शांत बसलेले दिसत आहे़
कापूस पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे़ तालुक्यात खरीप हंगामात २० हजार ८५० हेक्टरवर कापूस, १६ हजार २०० हेक्टरवर सोयाबीन, तर सहा हजार ९५० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे़ तालुक्यात गेल्या १ आॅगस्टपर्यंत २२ विविध सहकारी सोसायटींकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तीन हजार ८६४ शेतकऱ्यांनी २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपये पीक कर्ज घेतले आहे़
मारेगाव शाखेने नऊ सहकारी संस्थेतर्फे १ हजार ९५६ सभासदांना १३ कोटी १६ लाख ६६ हजार रूपये पीक कर्ज वाटप केले़ मार्डी शाखेने सहा सहकारी संस्थेतर्फे एक हजार २२६ शेतकऱ्यांना ७ कोटी ९९ लाख ३८ हजार, तर कुंभा शाखेने सहा सहकारी संस्थेतर्फे ६८२ शेतकऱ्यांना चार कोटी २६ लाख दोन हजारांचे कर्ज वाटप केले आहे़ मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने दगा दिला़ काहींची पेरणी साधली, तर काहींचे बियाणे उगवलेच नाही़ त्यातच सोयाबीन फुलोऱ्यावर येताच पाऊस गायब झाल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाही़ परिणामी सोयाबिनचे उत्पन्न घटने़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या़
यावर्षी मारेगाव तालुक्यात १९ आॅगस्टपर्यंत ९५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णत: गेला आहे़ गेल्यावर्षी कापसाला प्रती क्विंटल सरासरी किमान ४ हजार ८५० रूपये भाव मिळाला होता. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने १४ फेब्रुवारीपर्यंत तब्बल १ लाख ३६ हजार २६२़ क्विंटल कापूस खरेदी केला होता़ यावर्षी मात्र शासनाने भाव कमी दिल्याने व खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याने केवळ उद्घाटनप्रसंगीच कापूस खरेदी झाली़ आता कापसाचे भाव पुन्हा घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे़
मारेगाव तालुक्यात खरिपाची सुधारीत पैसेवारी ४३ टक्क्यांवर स्थिरावली आहे़ या पैसेवारीने तालुक्यात दुष्काळस्थिती असल्याचे संकेत संकेत दिले आहे़ अंतिम पैसेवारी १५ जानेवारीला जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे त्यात मोठा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी अद्याप आवाज उठविलेला नाही़ आता शेतकऱ्यांना केवळ पीक विम्याची आशा आहे.
शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे़ व्यापारी कापूस आणि सोयाबीनचे मनमानी दर ठरवीत आहे़
शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, हरभरा, बियाण्यांची पेरणी केली़ मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने अनेकांची पेरणी उलटली आहे़ दुष्काळाचे अस्मानी संकट बघता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़