चारचाकी वाहनांची सर्वाधिक खरेदी
By Admin | Updated: October 24, 2015 02:22 IST2015-10-24T02:22:42+5:302015-10-24T02:22:42+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी खरेदी करणाऱ्यांच्या विविध दुकानांमध्ये उड्या पडल्या होत्या.

चारचाकी वाहनांची सर्वाधिक खरेदी
दसऱ्याचा मुहूर्त : दुष्काळी परिस्थिती आणि महागाईवरही अनेकांची मात
यवतमाळ : साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी खरेदी करणाऱ्यांच्या विविध दुकानांमध्ये उड्या पडल्या होत्या. मात्र सर्वाधिक खरेदी झाली ती चारचाकी वाहनांची. दुचाकी वाहने आणि ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही चारचाकी वाहनांनी मात केल्याचे दिसत होते.
यवतमाळ हा कायम दुष्काळी जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा दुष्काळी वर्षातही जिल्ह्यातील चारचाकी वाहनांच्या विविध शोरूममधून अनेकांनी चारचाकी वाहनांची खरेदी केली. यात सर्वाधिक खरेदीदार शासकीय कर्मचारीच होते. शेतकरी मात्र दिसत नव्हते. शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सुलभ कर्ज आणि परतफेडीची हमी यामुळे बँकांपासून फायनान्स कंपन्यांपर्यंत सर्वच त्यांना कर्ज देण्यास उत्सुक असतात. याचाच फायदा घेत दसऱ्याचा मुहूर्त अनेकांनी साधला. दसऱ्याच्या दिवशी अनेकजण चारचाकी वाहन घेऊन आपल्या दारापुढे पोहोचल्याचे दिसत होते.
चारचाकी वाहनासोबतच अनेकांनी मुहूर्तावर दुचाकीचीही खरेदी केली. एका शोरूममधून दसऱ्याच्या दिवशी १३०० दुचाकी खरेदीचा विक्रम नोंदविला गेला.
दुष्काळी परिस्थिती आणि महागाईची स्थिती असताना वाहन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. दिवसेंदिवस वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. (नगर प्रतिनिधी)