भारत निर्माण प्रकल्पाचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: December 6, 2014 02:05 IST2014-12-06T02:05:41+5:302014-12-06T02:05:41+5:30
मागील तीन वर्षांपासून येथे भारत निर्माण प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे.

भारत निर्माण प्रकल्पाचे भिजत घोंगडे
मुकुटबन : मागील तीन वर्षांपासून येथे भारत निर्माण प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. वर्षभर वेगाने चाललेले काम आता कासवगतीत येऊन ठेपल्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे़
येथे भारत निर्माण प्रकल्पांतर्गत ३ कोटी १७ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला़ त्या अनुषंगाने गावाच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावरील पैनगंगा नदीवरून मुकुटबनवासीयांना शुध्द पाणी देण्यासाठी काम सुरू झाले. तीन वर्षांपूर्वी कामाला सुरूवात झाली़ नदीवर तीन विहिरी बांधण्यात आल्या़ मात्र प्रत्यक्षात त्यावर अद्याप मोटर बसविण्यात आल्या नाही़
पाणी वितरण प्रणालीअंतर्गत सध्या गावात आहे, त्याच जुन्या पाईपलाईनला पाईप जोडण्यात आले आहे. गावाच्या उंच भागावर नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. एका मोकळ्या जागी जलशुध्दीकरणाची इमारतही तयार झाली आहे. हे सर्व बांधकाम पूर्ण होऊनही, ग्रामस्थांना अद्याप शुद्ध पाणी मिळालेच नाही. यात नेमकी माशी कुठे शिंकली, हे कळायला मार्ग नाही़
या प्रकल्पाला मंजुरीसाठी तत्कालीन सरपंच प्रमोद बरशेट्टीवार, भूमारेड्डी बाजन्लावार, करमचंद बघेले, रमेश उदकवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार यांच्या माध्यमातून मंजुरी प्राप्त करून घेतली. त्यानंतर भूमिपूजन करण्यातच वेळ वाया गेला़ अखेर घाई-गडबडीत भूमिपूजन आटोपले़ कामही सुरू झाले़ पूर्वी काम करणाऱ्या कंत्राटदाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागला़ आता सर्व समस्या निकाली लागल्यानंतरही प्रकल्पाचे नेमके पाणी कुठे मुरत आहे, हे जनतेला कळत नाही. गावकऱ्यांना नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची प्रतीक्षाच लागून आहे. गावातील पाणी संपूर्ण फ्लोराईडयुक्त असल्यामुळे ग्रामस्थांना किडनी, गुडघ्याचे आजार, कमरेचे आजार, लहान मुलांचे हाडे ठिसूळ होणे, दात किडणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातून कधी सुटका होईल, याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)