नोटा बंदीने भाजीबाजार गडगडला
By Admin | Updated: November 17, 2016 01:25 IST2016-11-17T01:25:05+5:302016-11-17T01:25:05+5:30
नोटा बंदीच्या आदेशाने भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली आहे. मंदिच्या लाटेने भाजीबाजार गडगडल्याने परजिल्ह्यातील आवकही थांबली आहे.

नोटा बंदीने भाजीबाजार गडगडला
उलाढाल अर्ध्यावर : पर जिल्ह्यातील आवक थांबली
यवतमाळ : नोटा बंदीच्या आदेशाने भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली आहे. मंदिच्या लाटेने भाजीबाजार गडगडल्याने परजिल्ह्यातील आवकही थांबली आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या आदेशाने कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. नगदी पीक आणि तत्काळ हातात पैसा म्हणून भाजीपाल्याची लागवड होते. जिल्ह्यात भाजीपाल्याखाली १५ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या ठिकाणावरून जिल्ह्यासह परजिल्हा आणि विविध भाजीबाजारात भाजीपाला वितरीत होतो. जिल्हा मुख्यालयाची ही उलाढाल ५० टनाची आहे. यातून दर दिवसाला सात लाख रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री होते.
नोटाबंदीचा आदेश जाहीर होताच भाजीमंडीला करकचून ब्रेक लागले. ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा सरकारने बंद केल्या. पूर्वी या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या गेल्या. मात्र दोन दिवसांपासून या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला बंदी घालण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेल्या शेतमालाचे जुने पैसे हातात आले तरी, बँकेत जमा करता येणार नाही. यामुळे जुने चलन स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.
नवीन चलन उपलब्ध नाही. यामुळे जमा झालेल्या मोजक्या पैशाचाच भाजीपाला विकत घेतला जात आहे. यातून भाजीबाजार पूर्णत: संकटात सापडला आहे. विक्रीस येणाऱ्या शेतमालापैकी अर्धाअधिक शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. दररोज होणारी सात लाख रुपयांची उलाढाल दोन लाखांपर्यंत खाली आली आहे. (शहर वार्ताहर)
व्यापारी धास्तावले
जवळ असलेले पैसे, काही उधारी आणि काही जुन्या नोटा यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. आता सहकारी बँकांमधील जुन्या नोटांचा व्यवहार थांबविण्यात आला आहे. शेतकरी जुन्या नोटा स्वीकारत नाही. त्यामुळे दररोजचा व्यवहार करायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. किमान व्यवहारासाठी विड्रॉलची रक्कम वाढवायला हवी, असे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना रक्कम देणे शक्य होईल, असे मत हमीदखॉ पठाण यांनी व्यक्त केले.
भाजीपाला लागवडीचा खर्चही निघेना
सध्या भाजीपाल्याचे ठोक दर शेतकऱ्यांच्या शेतीच्या खर्चालाही न परवडणारे आहे. मेथी ८ ते १५ रूपये किलो, शिमला १५ , मिरची १२, फुलकोबी ८ ते १०, पानकोबी ६ , पालक १०, वांगे ५ , टमाटर १०, काकडी ६, चवळी १०, भेंडी १२ आणि सांभार ४० रुपये किलो दराने खरेदी केला जात आहे.