भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जन्मठेप
By Admin | Updated: June 18, 2017 00:51 IST2017-06-18T00:51:13+5:302017-06-18T00:51:13+5:30
नेर तालुक्यातील उमरठा येथील भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा

भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जन्मठेप
नेर तालुक्यातील घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेर तालुक्यातील उमरठा येथील भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
रामेश्वर शिवराम भेंडे (५१) रा. उमरठा असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. २५ एप्रिल २०१६ रोजी उमरठा येथे वनमाला नंदकिशोर भेंडे (३२) हिचा रामेश्वर भेंडेने चटई मागण्याव्च्या कारणावरून चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी पती नंदकिशोर शिवराम भेंडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक जी.पी. भावसार यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी नंदकिशोर भेंडे, प्रत्यक्षदर्शी मृताची मुलगी गौरी भेंडे (७), पूनम नरेश चव्हाण व आरोपीला घटनेनंतर चाकू घेऊन जाताना बघणारे अमोल भुसारी, विजय जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उत्तरीय तपासणी करणारे डॉ. संजय जाधव आणि तपास अधिकारी जी.पी. भावसार आदींच्या साक्ष ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्या. ए.टी. वानखेडे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाची बाजू अॅड.विजय तेलंग यांनी मांडली.