पुसद तालुक्यात चोख बंदोबस्त

By Admin | Updated: February 16, 2017 00:19 IST2017-02-16T00:19:43+5:302017-02-16T00:19:43+5:30

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पुसद तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली

Better settlement in Pusad taluka | पुसद तालुक्यात चोख बंदोबस्त

पुसद तालुक्यात चोख बंदोबस्त

प्रशासनाची जोरदार तयारी : संवेदनशील केंद्रांसाठी विशेष उपाययोजना
पुसद : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पुसद तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून तब्बल एक हजार २० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात निवडणुकीचे प्रशिक्षण दिले आहे. या निवडणुकीत पुसद तालुक्यातील एक लाख ८३ हजार ७६७ मतदार आपला हक्क बजावणार आहे. यासाठी तालुक्यात २२८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
पोलीस व महसूल दप्तरानुसार १४ गावातील ४६ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे, तर निवडणूक आयोगानुसार १२ केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यातील तीन केंद्र अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शासनाचा तंटामुक्तीचा पुरस्कारप्राप्त शेंबाळपिंपरी व बेलोरा या गावांचाही यामध्ये समावेश आहे. निवडणुकीसाठी चार पोलीस निरीक्षकांसह २४४ पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ तर पंचायत समितीचे १६ उमेदवार निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी १६ गणांमध्ये १६ झोन पाडले आहेत. एक हजार २० एवढ्या कर्मचाऱ्यांची मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी २१ एसटी बसेस, २२ जीपगाड्या आणि आठ शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसडीओ नितीनकुमार हिंगोले, सहायक अधिकारी तहसीलदार डॉ.संजय गरकल हे काम पाहात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल २२८ पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्येही उद्याच्या मतदानाची उत्सूकता दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)

महागाव तालुक्यात १५१ मतदान केंद्र
महागाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गुरूवारी होवू घातलेल्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून महागाव तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुक्यात एकूण १५१ मतदान केंद्र आहे. त्यासाठी तेवढेच मतदान पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये एक केंद्राधिकारी व तीन मतदान अधिकारी राहतील. संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त पोलीस विभागाकडून ठेवण्यात आला आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदींचीसुद्धा उपलब्धतेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व साहित्य आजच प्रत्येक केंद्रांवर रवाना झाले आहे. (शहर प्रतिनिधी)


उमरखेड तालुक्यात १ लाख ८८ हजार मतदार
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये गुरुवारी उमरखेड तालुक्यात पाच गटांसाठी मतदान होत आहे. यामध्ये एक लाख ८८ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. निवडणूक विभाग, पोलीस व महसूलने यासाठी चोख व्यवस्था केली आहे. एकूण १४३ मतदान केंद्र असून एकूण ६४० कर्मचारी नियुक्त केले आहेत. यामध्ये १५२ महिला कर्मचारी आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. १८० पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत. तालुक्यात एकूण ९ केंद्र आणि त्याअंतर्गत येणारी १४ गावे संवेदनशील असून येथे विषेश लक्ष दिले राहिल. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Better settlement in Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.