मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन कोटींचा लाभ
By Admin | Updated: March 31, 2016 03:02 IST2016-03-31T03:02:36+5:302016-03-31T03:02:36+5:30
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पीक विम्यापोटी तब्बल ३ कोटी १९ लाख ५२ हजार १६२ रूपये मिळणार आहे.

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन कोटींचा लाभ
पीक विमा : बोटोणी मंडळाला सर्वाधिक लाभ
बोटोणी : मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पीक विम्यापोटी तब्बल ३ कोटी १९ लाख ५२ हजार १६२ रूपये मिळणार आहे. यात कापूस व सोयाबीन पिकाचा समावेश आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून या बोटोणी मंडळातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ झाला आहे.
‘मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा’, या मथळ्याखाली गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर्षी कमी पडलेला पाऊस व निसर्गाच्या लहरीपणामुळे बोटोणी परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फटका बसला. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर शासनाने दखल घेत मारेगाव तालुक्यात कापूस व सोयाबीन पिकाला हवामान आधारित पीक विमा लागू केला. तालुक्यात कुंभा, मार्डी, मारेगाव, वनोजा, बोटोणी असे पाच महसूल मंडळ आहे. ५ हजार ७८६ कर्जदार शेतकऱ्यांनी सहा हजार ९९६.७६ हेक्टर क्षेत्राकरिता कापूस व सोयाबीन, तर १३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी १३.९० हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला होता.
खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये कुंभा १४८४, मार्डी ९१२, मारेगाव १५१४, वनोजा ११९०, बोटोणी या मंडळातील पाच हजार ७८६ कर्जदार शेतकरी, तर मारेगाव सहा, वनोजा दोन, बोटोणी पाच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेत विम्याची रक्कम जमा केली. गेल्यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे व बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. दिवाळी दरम्यान पाऊस गायब झाल्याने कापसाचे व सोबिनचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतातूर होते.
हवामान आधारित पीक विमा खरिपाकरिता लागू झाला आहे. यात सर्वाधिक लाभ बोटोणी मंडळातील कापूस पिकाला मिळाला. प्रति हेक्टर ६ हजार १६५, तर सोयाबीन पिकाला प्रति हेक्टर १ हजार ५३८ रूपये दर लागू झाला आहे. (वार्ताहर)