ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे विकासाला खीळ
By Admin | Updated: August 5, 2015 00:22 IST2015-08-05T00:19:48+5:302015-08-05T00:22:03+5:30
जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामपंचायतींची कामे खोळंबली आहेत.

ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे विकासाला खीळ
जिल्हा परिषद : जिल्ह्यात १९५ पदे रिक्त
यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामपंचायतींची कामे खोळंबली आहेत. यातच चौदावा वित्त आयोग लागू झाल्याने विकास कामांचा निधी खर्च करायचा कसा, असा गंभीर प्रश्न ग्रामपंचायतींसमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचायतींसाठी ८७६ ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत. यामध्ये १९५ पदे रिक्त आहेत. यामुळे एका ग्रामसेवकाला दोन ते तीन गावांची कामे सांभाळावी लागत आहेत. ही कामे करताना ग्रामसेवकाची चांगलीच कसरत होत आहे. यातच वेळेवर अहवाल न मिळाल्याने वरिष्ठ पातळीवर ग्रामपंचायतीला मिळणारा निधी परत जातो की काय, अशी भीती सरपंच व्यक्त करीत आहेत. १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. या संधीचा फायदा व्हावा, यासाठी रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. ग्रामसेवकांची मोठ्या प्रमाणात पदे जिल्ह्यात रिक्त असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहे. तसेच कार्यरत ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधूनही होत आहे. (शहर वार्ताहर)