बेलखेडच्या इसमाचा भोसकून खून
By Admin | Updated: October 28, 2015 02:35 IST2015-10-28T02:35:58+5:302015-10-28T02:35:58+5:30
गावी परत येणाऱ्या एका इसमावर धारदार शस्त्राने आठ ते दहा वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील बेलखेड येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

बेलखेडच्या इसमाचा भोसकून खून
शरीरावर आठ ते दहा वार : आरोपीच्या अटकेसाठी गावकऱ्यांची धडक
उमरखेड : गावी परत येणाऱ्या एका इसमावर धारदार शस्त्राने आठ ते दहा वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील बेलखेड येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मारेकऱ्यांचा अद्याप थांगपत्ता लागला नसून आरोपींच्या अटकेसाठी गावकरी उमरखेड ठाण्यावर धडकले होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
प्रल्हाद धनू जाधव (४८) रा. बेलखेड असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी गावानजीकच्या दत्तनगर शिवारातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याजवळ त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर, गालावर, डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते. या घटनेची माहिती गावात होताच नागरिकांचे लोंढेच्या लोंढे घटनास्थळावर पोहोचले. या प्रकरणी अनिल जाधव याने उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रल्हाद हा सोमवारी रात्री बेलखेड येथे कुपटीवरून येत होता. त्यावेळी अज्ञात इसमांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केल्याची माहिती आहे. मात्र हा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र कळू शकले नाही.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून या तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)