दहेगाव येथे अखेर गावठाण फीडर योजनेला झाली सुरूवात
By Admin | Updated: February 18, 2015 02:18 IST2015-02-18T02:18:41+5:302015-02-18T02:18:41+5:30
येथील महावितरणच्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ‘गावठाण फीडर योजना बारगळली’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरण आणि कंत्राटदार जागे झाले आहे.

दहेगाव येथे अखेर गावठाण फीडर योजनेला झाली सुरूवात
घोन्सा : येथील महावितरणच्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ‘गावठाण फीडर योजना बारगळली’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरण आणि कंत्राटदार जागे झाले आहे. आता या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
येथील महावितरणच्या उपकेंद्रांतर्गत् येणाऱ्या अनेक गावांमध्ये गावठाण फीडर योजनेच्या कामाला सुरूवात झाली होती. मात्र अनेक गावांमध्ये अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली नव्हती. त्यामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाला होता. येथील ३३ के़व्ही़ क्षमता असणाऱ्या उपकेंद्राअंतर्गत अनेक गावांमध्ये गावठाण फीडर योजनेचे काम सुरू करण्यात आले. तथापि गेल्या वर्षभरापासूनही ते पूर्णत्वास गेले नाही़ दहेगाव येथेसुध्दा वर्षभरापासून योजना पूर्ण झाली नाही. तेथे गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेअंतर्गत जनित्र व विजेचे खांब बसविण्यात आले होते़ मात्र ते सुरू करण्यात आले नव्हते़ याबाबत ‘लोकमत’ने १० फेब्रुवारीच्या अंकात ‘गावठाण फीडर योजना बारगळली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच दहेगाव येथील गावठाण फीडर योजना सुरू करण्यात आली आहे. येथील महावितरणच्या ३३ के़व्ही़ उपकेंद्राअंतर्गत जवळपास ३८ ते ४० गावांना वीज पुरवठा केला जातो.
उपकेंद्राअंतर्गत साखरा, खडकडोह, सुसरी पेंढरी येथे तीन फीडर आहे. सर्व गावांना वीज पुरवठा तेथील एकाच जनित्रावरून होतो. त्याच जनित्रावर गावाची आणि कृषी पंपाची वीज जोडणी असते़ परिणामी अनेक गावांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यासाठी शासनाने गावठाण फीडर योजना कार्यान्वित केली होती. तथापि ती अनेक गावांत सुरूच झाली नाही. कंत्राटदाराने वीज खांब, जनित्र उभे करून ठेवले आहे. प्रत्यक्षात कुठेच वीज पुरवठा सुरू झाला नाही. परिणामी ग्राहकांना अद्यापही भारनियमनाचा सामना करावा लागतो. दहेगाव येथेही केवळ खांब आणि जनित्र उभे करण्यात आले होते. प्रत्यक्षात वीज पुरवठा सुरू झालाच नव्हता. त्याला आता मुर्हूत सापडला आहे. उर्वरित इतरही गावांमध्ये ही योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)