महाविकास आघाडीत वर्चस्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST2021-08-14T05:00:00+5:302021-08-14T05:00:07+5:30

शिवसेनेने काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत राज्याच्या सत्तेतून भाजपला बाहेर काढले. त्यानंतर बहुतांश जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे तीनही पक्ष एकत्रित  आले. सत्तेची चव गुण्यागोविंदाने चाखत असतानाच अधूनमधून वर्चस्वाची लढाई दिसून येते. पुढील काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना या तीनही पक्षांना सामोरे जायचे आहे. त्यामुळेच काॅंग्रेससह इतर पक्षातूनही आता स्वबळाचे आवाज घुमू लागले आहेत. 

The battle for supremacy in the Mahavikas front | महाविकास आघाडीत वर्चस्वाची लढाई

महाविकास आघाडीत वर्चस्वाची लढाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य पातळीवर महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करतात. याचेच प्रतिबिंब जिल्ह्यातही उमटताना दिसते. जिल्हा परिषदेसह जिल्हा बॅंक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थात ही तीनही पक्ष एकत्रित असले तरी जिल्ह्यावर आपल्याच पक्षाचे वर्चस्व असावे यासाठी प्रयत्न सुरू असतात, त्यामुळेच अनेक वेळा हे तीनही पक्ष संघर्षाच्या भूमिकेत दिसत आहेत. 
शिवसेनेने काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत राज्याच्या सत्तेतून भाजपला बाहेर काढले. त्यानंतर बहुतांश जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे तीनही पक्ष एकत्रित  आले. सत्तेची चव गुण्यागोविंदाने चाखत असतानाच अधूनमधून वर्चस्वाची लढाई दिसून येते. पुढील काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना या तीनही पक्षांना सामोरे जायचे आहे. त्यामुळेच काॅंग्रेससह इतर पक्षातूनही आता स्वबळाचे आवाज घुमू लागले आहेत. 

पंचायत समिती
जिल्ह्यात १६ पंचायत समिती आहेत. यातील बहुतांश ठिकाणी स्थानिक तडजोडीतून सत्ता स्थापन झालेली आहे. सर्वाधिक सभापतीपदे मात्र शिवसेनेकडे आहेत. 

जिल्हा परिषद 
महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षात वर्चस्व वादावरुन लढाई सुरू असली तरी जिल्हा परिषदेत हे तीनही पक्ष एकत्रित आहेत. ६१ सदस्यीय सभागृहात शिवसेनेचे सर्वाधिक २०, भाजप १८, काॅंग्रेस १२ आणि राष्ट्रवादीचे ११ सदस्य आहेत. दीड वर्षापासून महाविकास आघाडी कार्यरत असली तरी अधूनमधून कुरबुर सुरू असते. 

यवतमाळ नगरपालिका
५६ सदस्यीय यवतमाळ नगरपालिकेत भाजपची सत्ता असून पक्षाकडे उपनराध्यक्षपद आहे. मात्र थेट नगराध्यक्ष निवडणूक शिवसेनेने जिंकलेली आहे. पाच स्वीकृत सदस्य आहेत. 

तीन पक्ष, तीन विचार

शिवसेना शाखेच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत पक्ष पोहोचलेला आहे. आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना विविध उपक्रमातही पुढे असते. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा जनाधार आहे. त्यामुळेच आदेश आल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढू शकते. 

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीची भूमिकाही महत्वाची आहे. जिल्हा बॅंके बरोबरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद या पक्षाकडे आहे. आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षाचे वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.  

यवतमाळ जिल्हा कधी काळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळू शकते, असे पदाधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींप्रमाणेच स्थानिक नेतेही स्वबळाची भाषा करतात. त्या दृष्टीने पक्षाकडून गावपातळीवर मोहिमा राबविल्या जात आहेत.

पक्षांचे जिल्हाप्रमुख म्हणतात....

राज्यात एका विचाराने महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. जिल्ह्यातही आम्ही सोबत आहोत. काॅंग्रेसचा डावलेले जात असल्याचा आरोप चुकीचा आहे. जिल्हा बॅंकेत काॅंग्रेसकडे अध्यक्षपद असून शासकीय रुग्णालयातील अभ्यागत समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे.  त्यामुळे काॅंग्रेसला डावलले म्हणणे निराधार आहे. 
- पराग पिंगळे
जिल्हा प्रमुख, शिवसेना 

पुरोगामी विचारावर चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. भाजपला रोखण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली आहे. यामध्ये काॅंग्रेसला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यातील सत्तेचा योग्य तो सन्मानजनक वाटा काॅंग्रेसला दिला आहे. प्रत्येकलाच पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसही जिल्ह्यात पक्षबांधणी करीत आहे.        
- बाळासाहेब कामारकर 
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची भूमिका अगोदरच स्पष्ट केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काॅंग्रेस स्वबळ अजमावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार काॅंग्रेस जिल्ह्यात पक्षबांधणी करीत आहे. गाववाड्यापर्यंत काॅंग्रेस पोहोचलेली आहे. पक्ष वाढविण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार काम सुरू आहे.  
- आ. डाॅ. वजाहत मिर्झा
जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस

 

Web Title: The battle for supremacy in the Mahavikas front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.