बसपाच्या नेतृत्वात धडकला मोर्चा
By Admin | Updated: September 30, 2016 02:49 IST2016-09-30T02:49:46+5:302016-09-30T02:49:46+5:30
बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात गुरूवारी समता मैदानातून

बसपाच्या नेतृत्वात धडकला मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अॅट्रोसिटी, मुस्लीम आरक्षणाची मागणी, हजारोंची उपस्थिती
यवतमाळ : बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात गुरूवारी समता मैदानातून निघालेल्या मोर्चातील निळ्या आणि पिवळ्या झेंड्यांनी यतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. हा मोर्चा कुणाहीविरूद्ध नसून आपल्या न्याय मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी असल्याचे शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन देताना स्पष्ट केले.
२६ जानेवारी २०१५ च्या सुधारित अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि मुस्लीम समाजाला आरक्षणासह इतर पाच प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. प्रथम मोर्चेकरी समता मैदानात गोळा झाले. यावेळी मैदानात सर्वत्र निळे आणि पिवळे झेंडे डौलाने फडकत होते. अनेक मोर्चेकऱ्यांच्या हाती झेंडे होते. मोर्चेकऱ्यांना पंडित दिघाडे, गीत घोष, ताराचंद पवार, डॉ. निरंजन मसराम, अनिल दसमोगरे, मनीषा तिराणकर आदींनी संबोधित केले. यावेळी प्रफुल शंभरकर, प्रवीण ्नखानझोडे, बाळकृष्ण गेडाम, प्रफुल गेडाम आदी उपस्थित होते. नंतर दुपारी २ वाजता बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. (शहर प्रतिनिधी)