बडदास्तीसाठी ‘आडजात’चा आधार
By Admin | Updated: January 3, 2015 02:08 IST2015-01-03T02:08:40+5:302015-01-03T02:08:40+5:30
परिपक्व सागवान वृक्षांबरोबरच आता आडजात कत्तलीचा सपाटा सुरू आहे. वनजमीन आणि मालकी खसाऱ्यातील आडजात कत्तल करून थेट विक्रीसाठी वखारी जात आहे.

बडदास्तीसाठी ‘आडजात’चा आधार
यवतमाळ : परिपक्व सागवान वृक्षांबरोबरच आता आडजात कत्तलीचा सपाटा सुरू आहे. वनजमीन आणि मालकी खसाऱ्यातील आडजात कत्तल करून थेट विक्रीसाठी वखारी जात आहे. असे असताना केवळ वरिष्ठ वनाधिकारी आडजातच्या तस्करांकडून बडेजावसाठी मिळत असलेल्या रकमेपोटी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यासाठी वनसंरक्षणाची कामे सोडून चक्क वनमजुरांनाच नेमण्यात आल्याची माहिती आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण यवतमाळ वनवृत्तातच मौल्यवान सागवान वृक्षांबरोबर आडजातीची वृक्षही मोठ्या प्रमाणात आढळतात. इंधन आणि फर्नीचरसाठी आडजात लाकडाची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. नेमकी हीच बाब हेरून आता काही तस्करांनी सागवान वृक्षांबरोबरच आडजात वृक्षांचीही कत्तल करण्याचा सपाटा चालविला आहे. मालकी खसारा (शेती) मध्ये असलेले आडजात वृक्ष शेतकरी विकतात. हे वृक्ष खरेदी करून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची वृक्षतोड परवानगी आणि वनविभागाची वाहतूक पास अशी कुठलीच प्रक्रिया लाकूड व्यावसायिक करीत नाहीत. थेट झाडे तोडून त्यांचे लाकूड आरामशीन आणि वखारीत नेल्या जाते.
यवतमाळ वनवृत्तातील सर्वच उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत हा गंभीर प्रकार सर्रास सुरू आहे. आडजात ठेकेदारांना वृक्षांची तोड, वाहतूक आणि विक्री बिनबोभाटपणे करून देण्याचा जणू वनाधिकाऱ्यांनी अलिखित करारच करून दिला आहे. त्यासाठी ठेकेदार महिन्याकाठी ठरलेली रक्कम मोजतात. या रकमेतून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बडदास्त केली जाते. या आर्थिक वसूलीची जबाबदारी काही वनमजुरांकडे सोपविण्यात आली आहे.
वसूलीत माहिर वनमजुरांना वनसंरक्षणाचे कुठलेही काम देण्यात येत नाही. केवळ वसूली करायची आणि शासनाचा पगार घ्यायचा एवढीच त्यांची जबाबदारी आहे. एवढेच नव्हे तर वनाधिकाऱ्यांच्या ओल्या पार्ट्यांमध्ये सरबराई आणि त्यांची दैनंदिन कामेही या वनमजुरांकडूनच करवून घेतली जात असल्याचे दिसून येते.
(स्थानिक प्रतिनिधी)