बरलोटा रुग्णालयात तोडफोड, मारहाण
By Admin | Updated: October 19, 2015 00:15 IST2015-10-19T00:15:27+5:302015-10-19T00:15:27+5:30
महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी येथील महादेव मंदिर रोडस्थित बरलोटा हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी तोडफोड केली.

बरलोटा रुग्णालयात तोडफोड, मारहाण
महिलेचा मृत्यू : हलगर्जीपणाचा आरोप
यवतमाळ : महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी येथील महादेव मंदिर रोडस्थित बरलोटा हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी तोडफोड केली. यावेळी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे.
डॉ. पीयूष बरलोटा यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी जितेंद्र वीरदंडे, पत्रकार विवेक गावंडेसह पाच ते सात जणांविरुद्ध भादंवि १४३, १४४, १४७, ४२६, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर गावंडे यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली असून डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. मात्र त्यांची तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे.
वर्षा सुधीर डंभारे (२५) रा.येळाबारा असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मृत्यू नागपूर येथे उपचारादरम्यान झाला. आज तिच्या मृतदेहासह नातेवाईक बरलोटा हॉस्पिटलमध्ये धडकले. याप्रकरणी मृताचे पती सुधीर डंभारे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाला चार वर्षे होऊनही मुलबाळ होत नसल्याने त्यांनी डॉ. सुरेखा बरलोटा यांची ट्रिटमेंट घेतली. त्यानंतर दोष दूर होऊन सुधीर यांची पत्नी गर्भवती राहिली. तिला आठ महिने पूर्ण झाले होते. तपासणीसाठी १ आॅक्टोबरला तिला डॉ. बरलोटा यांच्याकडे नेले होते. त्यांनी सोनोग्राफी सांगितली. २ आॅक्टोबरला रिपोर्ट पाहून वर्षाच्या पोटातील पाणी कमी झाले आहे, गर्भाच्या गळ्याला नाळ गुंडाळली असून लगेच सिझर करावे लागेल, असे सांगितले. त्याच दिवशी दुपारी सिझर केले गेले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून बाळ व बाळंतीण या दोघांचीही प्रकृती बिघडत असल्याचे डॉक्टरने सांगितले. दरम्यान, प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांनी ५ आॅक्टोबर रोजी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नवजात बाळाला खासगी रुग्णालयात ठेऊन वर्षाला नागपूरला हलविले गेले. तेथे उपचारादरम्यान १३ आॅक्टोबरला वर्षाचे निधन झाले. डॉक्टरांनी नागपूरला रुग्ण हलविण्यासाठी स्वत:च २५ हजार व अॅम्बुलन्स दिली, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुधीर डंभारे यांनी केला आहे. यातील नवजात बालिकाही १३ आॅक्टोबर रोजी मरण पावली. याप्रकरणी डॉ. सुरेखा बरलोटा म्हणाल्या, वर्षाच्या सिझरनंतर सर्व काही ठिकठाक होते. मात्र नंतर श्वास घेण्यास त्रास झाल्याने तज्ज्ञांना दाखविण्यात आले. रिस्क नको म्हणून नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. ५ आॅक्टोबरला वर्षाला नागपूरला हलविले गेले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधला नाही. गेल्या १२ दिवसात वर्षावर काय ट्रिटमेंट करण्यात आली, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचा माझ्यावर दोष कसा, असा प्रश्नही डॉ. सुरेखा यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)