लाचखोर अन्न निरीक्षक निलंबित
By Admin | Updated: April 24, 2015 01:15 IST2015-04-24T01:15:48+5:302015-04-24T01:15:48+5:30
हॉटेल व्यावसायिकांकडून तब्बल ५१ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या अन्न निरीक्षकाला गुरुवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

लाचखोर अन्न निरीक्षक निलंबित
यवतमाळ : हॉटेल व्यावसायिकांकडून तब्बल ५१ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या अन्न निरीक्षकाला गुरुवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
प्रभाकर निवृत्ती काळे असे लाचखोर अन्न निरीक्षकाचे नाव आहे. सोमवारी आपल्या कार्यालयासमोरच त्याने आर्णी येथील हॉटेल व्यावसायिकांकडून ५१ हजार रुपयांची लाच घेतली होती. आर्णी येथील हॉटेल व्यावसायिकांकडून गोळा केलेल्या अन्न नमुन्यांवर कारवाई न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. याकरिता शहरातील नऊ हॉटेल व्यावसायिकांकडून लाच मागण्यात आली. प्रत्येकांनी लाचेची रक्कम गोळा करून याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यावरून सापळा रचण्यात आला. हे ५१ हजार स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सोमवारी रात्री ९.३० वाजता प्रभाकर काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. काळे यांना विशेष न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यानच्या काळातच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी काळे यांच्या तत्काळ निलंबनाचे आदेश दिले. गुरुवारी काळे न्यायालयीन कोठडीतून बाहेर आल्यानंतर सहाय्यक आयुक्त औषधी अमृत निखाडे यांनी हा निलंबनाचा आदेश बजावला. (कार्यालय प्रतिनिधी)