ढाणकीकरांसाठी बँकेच्या योजना मृगजळच
By Admin | Updated: February 12, 2016 03:04 IST2016-02-12T03:04:22+5:302016-02-12T03:04:22+5:30
बँकेच्या विविध आकर्षक योजनांच्या जाहिराती वृत्तपत्रात छापून येतात. प्रत्यक्षात ढाणकीकरांना मात्र अनेक

ढाणकीकरांसाठी बँकेच्या योजना मृगजळच
ग्राहकांना मनस्ताप : कर्जासाठी उंबरठे झिजवून थकले नागरिक
ढाणकी : बँकेच्या विविध आकर्षक योजनांच्या जाहिराती वृत्तपत्रात छापून येतात. प्रत्यक्षात ढाणकीकरांना मात्र अनेक अग्नीदिव्य पार करूनही या योजनांचा लाभ मिळत नसल्याने ढाणकीकरांसाठी बँकेच्या योजना म्हणजे निव्वळ मृगजळ ठरत आहेत.
बँकेतर्फे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय-उद्योगासाठी कर्ज, कॅश क्रेडीट, सुवर्ण तारण कर्ज, अशा विविध कर्ज योजना राबविल्या जातात. घर हे तर प्रत्येकाचे एक स्वप्न असते. बांधकामाच्या साहित्याच्या वाढत्या किंमती पाहता कर्जाशिवाय घर बांधणे हे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरचे असते त्यामुळे बँकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी लोक बँकेकडे येतात. गृहकर्जासाठी बँकेच्या चकरा मारुन कर्ज मागणाऱ्यांच्या चपला व बँकेचे उंबरठे दोनही झिजतात परंतु कर्ज काही मिळत नाही हा येथील बहुतांश व्यापारी व कर्मचारी यांचा अनुभव आहे.
वैयक्तिक कर्जाचाही हाच अनुभव ग्राहकांना येत आहे. कामाचा खूप व्याप आहे. या सबबीखाली शाखा व्यवस्थापक ग्राहकांना पुन्हा पाहू असे म्हणून टोलवाटोलवी करतात. काही धनदांडग्यांना मात्र सर्व योजनांचा लाभ दिला जातो. कॅश क्रेडीट, मुद्रा सारख्या योजनांचा लाभ ‘तोंड पाहून’ देण्यात आल्याचा आरोपही होत आहे. लोन केस करण्यासाठी विमा काढण्याचा आग्रह धरला जातो. विम्याचे प्रिमीयम अगोदरच घेतले जाते आणि मग पुन्हा कर्जासाठी कर्जदारांना फिरवले जाते. परंतु कर्जदाराला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
असा अनुभव येथील स्टेट बँकेच्या शाखेत अनेकांनी घेतला आहे. परंतु स्थानिक व्यवस्थापनामुळे बँकेच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र या प्रकाराकडे लक्ष द्यायला वरिष्ठांनाही वेळ दिसत नाही. (वार्ताहर)