पांढरकवडाच्या बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार ढेपाळला

By Admin | Updated: September 12, 2016 01:25 IST2016-09-12T01:25:40+5:302016-09-12T01:25:40+5:30

येथील बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक दिक्षीत यांची बदली ...

Bank of Maharashtra's Bank of Baroda | पांढरकवडाच्या बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार ढेपाळला

पांढरकवडाच्या बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार ढेपाळला

ग्राहक वैतागले : कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचेही प्रमाण वाढले
पांढरकवडा : येथील बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक दिक्षीत यांची बदली झाल्याने नव्याने रूजू झालेल्या व्यवस्थापकाचे नियंत्रण कर्मचाऱ्यांवर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैैतागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर बँक आॅफ महाराष्ट्र ही गोरगरिब, सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजुरांची बँक समजली जाते. या शाखेतील कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी करून उद्धट वागणूक देत असून ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमालीची घटली असून त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होताना दिसून येत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांची कामे तडकपणे निपटवून मोकळी न करता बँकेत विनाकारण गर्दी जमविली जाते. आधीच ही बँक कमी जागेत चालविली जात असल्यामुळे गर्दी झाल्यास तेथे उभेसुद्धा राहायला जागा नसते. कामाची गती वाढविल्यास गर्दी त्वरित पांगविता येते, हे बँकेला वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील ग्राहकांची हेळसांड होत आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात शहरी व ग्रामीण ग्राहकांचा भरणा असल्यामुळे बँकेत अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. असे झाल्यास येथील कर्मचाऱ्यांवर वचक राहिल, असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. पासबुकात एंट्री करणे, नवीन खाते उघडणे, खाते उतारे, चेक कलेक्शन, विविध कर्ज प्रकरणे, फायनान्सची कामे घेऊन विविध ग्राहक बँकेत येतात. त्यांची कामे रेंगाळत असल्यामुळे त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
शेतकरी, शेतमजुर मजुरी बुडवून बँकेत कामानिमित्त येतात व त्यांना विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. वृद्ध व निराधार ग्राहकांनादेखिल मनस्ताप सहन करावा लागत आहे. वृद्ध व निराधारांसाठी वेगळे काऊंटर ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असलेल्या या बँकेत वारंवार वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहे. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण ताटकळत राहावे लागते. असे प्रकार सध्या वाढीस लागले असून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bank of Maharashtra's Bank of Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.