शहरातील बँक शाखांची सुरक्षा आली वाऱ्यावर
By Admin | Updated: August 3, 2014 00:19 IST2014-08-03T00:19:26+5:302014-08-03T00:19:26+5:30
येथील दोन राष्ट्रीयीकृत बँका व तीन स्थानिक बँकाकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नाही. बँकेत ना सुरक्षा रक्षक आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरे आहे़ त्यामुळे या बँकांची सुरक्षितताच धोक्यात

शहरातील बँक शाखांची सुरक्षा आली वाऱ्यावर
मारेगाव : येथील दोन राष्ट्रीयीकृत बँका व तीन स्थानिक बँकाकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नाही. बँकेत ना सुरक्षा रक्षक आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरे आहे़ त्यामुळे या बँकांची सुरक्षितताच धोक्यात सापडली आहे़
बँकात पैसे लुटण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरातील बँका मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्धास्त दिसून येत आहे़ येथे भारतीय स्टेट बँक, भारतीय सेंट्रल बँक, विदर्भ ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, रंगनाथ स्वामी बँकेच्या शाखा आहेत. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यापैकी एकाही बँक शाखेत सुरक्षा रक्षक नाही़
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या बँकेत ग्रामीण भागातून येणारा ग्राहक वर्ग मोठा आहे़ अशिक्षित असलेल्या या बँक ग्राहकांची बरेचदा फसवणूकही होते़ परंतु बँकेत सुरक्षा रक्षक नसल्याने कुणाची मदत घ्यावी, असा प्रश्न ग्राहकांना पडतो़ ग्राहकांच्या अज्ञानाचा लाभ घेत अनेक दलाल बँकेत सक्रिय झाले आहेत़ ग्राहकांचे विड्राल करून देणे, बँक खाते उघडण्याचा अर्ज भरून देणे, आदी कामे करून देण्याच्या नावावर ग्रामीण जनतेची आर्थिक लूट सुरू आहे़
नुकतीच शहरात स्टेट बँकेतर्फे एटीएम सुविधा सुरू करण्यात आली. परंतु तेथेसुध्दा सुरक्षा रक्षक नाही किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा नाही़ शहरातील बहुतांश बँका वर्दळीपासून दूर असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. या बँकानी सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तूर्तास त्यांची सुरक्षितता वाऱ्यावरच आहे. (शहर प्रतिनिधी)