उपविभागीय कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा

By Admin | Updated: August 14, 2014 00:07 IST2014-08-14T00:07:07+5:302014-08-14T00:07:07+5:30

उमरखेड उपविभागीय कार्यालयावर गोर बंजारा सेनेने आपल्या विविध २६ मागण्या घेवून मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाने उमरखेडवासीयांचे लक्ष वेधले.

Banjara community's front at the sub-divisional office | उपविभागीय कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा

उपविभागीय कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा

उमरखेड(कुपटी) : उमरखेड उपविभागीय कार्यालयावर गोर बंजारा सेनेने आपल्या विविध २६ मागण्या घेवून मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाने उमरखेडवासीयांचे लक्ष वेधले.
उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. १९७० पासून गोर बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात असलेला प्रस्ताव आजही धूळ खात पडला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्वच निकष पूर्ण करीत असताना हेतुपुरस्सर बंजारा समाजाची शक्ती कमी करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यात त्यांना वेगवेगळ्या सूचित टाकण्यात आले. त्यांना त्या प्रवर्गातून काढण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. यासोबतच प्रमुख २६ मागण्यांच्या निवेदनासह हा मोर्चा दुपारी १२ वाजता उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून उपविभागीय कार्यालयाकडे निघाला. बंजारा समाजाच्या नागरिकांनी यामध्ये डफडे वाजवित निदर्शने केली. उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले. शिष्टमंडळात संजय चव्हाण, सतीश राठोड, दिलीप चव्हाण, गोकुल राठोड, अशोक राठोड, संजय मुंदे, संतोष जाधव, विजय जाधव, जितेंद्र जाधव, राजू जाधव, विलास चव्हाण, राम आडे, अविनाश राठोड, हरिश्चंद्र राठोड, संजय जाधव, पवन राठोड, अशोक पवार, अंकुश आडे आदींसह गोर बंजारा समाजातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
गोर बंजारा सेनेने काढलेल्या या मोर्चामध्ये उमरखेड व महागाव या दोन तालुक्यातील सुशिक्षित युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे कुठल्याही राजकीय संघटनेचा आधार न घेता समाजातील युवकांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वयंस्फूर्तीने काढलेल्या या मोर्चाने शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. (वार्ताहर)

Web Title: Banjara community's front at the sub-divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.