बंदला वैद्यकीय शिक्षकांचा पाठिंबा
By Admin | Updated: March 24, 2017 02:09 IST2017-03-24T02:09:22+5:302017-03-24T02:09:22+5:30
सुरक्षेच्या मुद्यावरून खासगी डॉक्टरांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी, वरिष्ठ निवासी, आवासी वैद्यकीय अधिकारी,

बंदला वैद्यकीय शिक्षकांचा पाठिंबा
रूग्णसेवा ठप्पच : आवासी, आंतरवासिता डॉक्टरही संपात
यवतमाळ : सुरक्षेच्या मुद्यावरून खासगी डॉक्टरांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी, वरिष्ठ निवासी, आवासी वैद्यकीय अधिकारी, आंतरवासीता डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले. ४१ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निष्कासनाची कारवाई केल्याने हे आंदोलन आणखी चिघळले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक (एमएसएमटीए) संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मागण्या मान्य न झाल्यास कामबंदचा इशारा दिला.
निष्कासन कारवाईच्या निषेधार्थ खासगी डॉक्टरांनीसुद्धा (आयएमए) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. या स्थितीत निवासी डॉक्टरांच्या बाजूने ३४ वरिष्ठ निवासी अधिकारी, ८४ आवासी वैद्यकीय अधिकारी आणि १०० आंतरवासीता डॉक्टरांनी आंदोलनात उडी घेतली. त्यांनाही रूग्णालय प्रशासनाकडून निष्कासित का करू नये, अशी नोटीस बजावली गेली आहे. डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा शासकीय रूग्णालयातील अध्यापकांनी काळ््या फिती लावून निषेध केला. निवासी, आवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने अध्यापकांवरील कामाचा ताण वाढला आहे. रूग्णांची गर्दी होत असून यातूनच शासकीय रूग्णालयात कार्यरत डॉक्टरांना रोषाचा सामना करावा लागत आहे. सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता, शासकीय रूग्णालयात प्रसूतिगृह, आकस्मीक कक्ष, अतिदक्षता कक्ष आणि काही ठरावीक वॉर्डांमध्ये सुरक्षा रक्षकांसह शस्त्रधारी पोलीस नियुक्त करावे, अशी मागणी एमएसएमटीएने निवेदनातून केली. यावेळी एमएसएमटीएचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलींद कांबळे, डॉ. गिरीष जतकर, डॉ. सुरेंद्र गवार्ले, डॉ. बाळकृष्ण बांगडे, डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. संजय भारती, डॉ. शरद कुचेवार, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. चेतन जनबाधे, डॉ. शेखर घोडेस्वार, डॉ. जय राठोड आदींसह रूग्णांलयातील प्राध्यापक, सहायोगी प्राध्यापक आणि सहायक सहयोगी प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांना निवेदन दिले.
दरम्यान, डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रूग्णालयातील अपंगांचे मेडिकल बोर्ड रद्द करण्यात आले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
ज्येष्ठांकडून उपचाराची पर्वणी
शासकीय रूग्णालयात अपवाद वगळता कुठेच आंदोलनाचा परिणाम दिसला नाही. उलट ज्येष्ठ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची पर्वणी यानिमित्ताने रूग्णंना चालून आली. एक-दोन अपवाद वगळता कोणत्याच विभागातील ज्येष्ठ डॉक्टर बाह्यरूग्ण तपासणी, वॉर्डमध्ये व्हिजीट घेत नाहीत. प्रथमच बहुतांश डॉक्टर रूग्णालयात उपस्थित राहून रूग्णांची विचारपूस करताना आढळले. त्यामुळे बुधवारी सकाळी ८ ते गुरूवारी सकाळी ८ वाजतापर्यंत बाह्यरूग्ण विभागात तब्बल एक हजार २३४ रूग्णांची तपासणी झाली. यापैकी १३३ रूग्णांना दाखल केले. अपघात कक्षात २३७ रूग्ण आले. १८ रूग्णांवर दुर्धर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर दोन रूग्णांवर लघुशस्त्रक्रिया झाली. १२ साधारण प्रसूती आणि सात शस्त्रक्रियेद्वारा करण्यात आल्या. अतिदक्षता कक्षातही १४ रूग्णांना दाखल केले. संप काळातील या आकडेवारीत व नियमित आकडेवारीत विशेष कोणताच फरक जाणवला नाही. केवळ निवासी, आवासी व प्रशिक्षणार्थी डॉक्टर नसल्याने पोस्ट मेडिकल सेवा पूर्णत: ठप्प पडली आहे. शस्त्रक्रियेनंतर निगराणी ठेवण्याचेही काम ज्येष्ठ डॉक्टरांनाच करावे लागत आहे. यावरही उपाय शोधून ‘सीपीएस’ डॉक्टरांची मदत घेण्यात आली.