तरोडा येथील बंधारे निकृष्टच

By Admin | Updated: July 15, 2016 02:39 IST2016-07-15T02:39:52+5:302016-07-15T02:39:52+5:30

तालुक्यातील तरोडा येथे निर्माण करण्यात आलेल्या तीनही सिमेंट बंधाऱ्यांची कामे प्राकलन डावलून करण्यात आली. या कामात अनेक त्रुटी आहेत.

The Bandhargarh of Taroda is worthless | तरोडा येथील बंधारे निकृष्टच

तरोडा येथील बंधारे निकृष्टच

एसडीओकडून तपासणी : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर
कळंब : तालुक्यातील तरोडा येथे निर्माण करण्यात आलेल्या तीनही सिमेंट बंधाऱ्यांची कामे प्राकलन डावलून करण्यात आली. या कामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येते, असा अहवाल उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
कळंब तालुक्यातील तरोडा येथे निकृष्ट बंधारे उभारण्यात येत असल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी के. बी. आठवले यांच्या पथकाने बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. यामध्ये सिमेंट नालाबांधापासून नालापात्रामध्ये सोडलेल्या बर्मची लांबी जास्त असणे. दगडी पिचिंग न करणे. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करणे. नाला खोलीकरणातून निघालेली माती नाल्याच्या दोन्ही काठावर अस्ताव्यस्त टाकणे. माती वाहून न नेणे. त्यामुळे ही टाकलेली माती पुन्हा नाल्यात कोसळू शकते. त्यामुळे पाणीसाठा कमी होऊन मूळ उद्देश सफल होणार नाही. बांधाला आकार देऊन त्याचा टॉप व्यवस्थित करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी बांधाची खोली व रुंदी कमी आढळून येते. तीनही सिमेंट नाल्याचे बांधकाम प्राकलनानुसार झाल्याचे दिसून येत नाही, असा अहवाल उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे पाठविला आहे. तसेच याची माहिती बेंबळा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
तसे पाहिल्यास, सुरुवातीपासूनच या बंधाऱ्यांची कामे प्राकलनानुसार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. बंधाऱ्याची खोली बहुतेक ठिकाणी राखल्या गेली नाही. मातीचे केवळ ढिगारे मारण्यात आले. कुठेही बर्म सोडण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी माहिती वाहून नेणे गरजेचे असताना एकही ब्रास माती वाहून नेण्यात आली नाही. राजकीय वरदहस्त असलेले कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधांमुळे हा प्रकार झाल्याचे उघडपणे बोलले जाते. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या अहवालावर ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Bandhargarh of Taroda is worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.