सेनेत उमेदवारांची आयात बंद
By Admin | Updated: January 31, 2015 23:26 IST2015-01-31T23:26:53+5:302015-01-31T23:26:53+5:30
शिवसेनेला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात ऐन वेळेवर उमेदवार आयात करावे लागले. आता अशा उमेदवारांना

सेनेत उमेदवारांची आयात बंद
गजानन कीर्तीकर : शिवसंपर्क अभियानाचा समारोप, शिवसैनिकांतून शोधणार नेतृत्व
यवतमाळ : शिवसेनेला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात ऐन वेळेवर उमेदवार आयात करावे लागले. आता अशा उमेदवारांना शिवसेनेत घेतले जाणार नाही. शिवसैनिकांनी आज पासूनच स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असे आवाहन शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी केले. येथील शिवसंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐन वेळेवर शिवसेनेला दगा दिला. त्यामुळे काही ठिकाणी उमदेवार शोधण्यासाठी धडपड करावी लागली. अशा बाहेरून आणलेल्या उमेदवारांच्या भरवशावर निवडणूक लढता येत नाही हे आता कळून चुकले आहे. पक्षातच १० ते १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाणार आहे. २०१९ ची किंवा त्यापूर्वीच होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. आता शिवसेनेत निष्क्रीयता खपवून घेतली जाणार नाही. आपण सत्तेत असलो तरी त्याचे समाधान नाही. एकेकाळी शिवसेनेची सत्ता होती, अजुनही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. त्यासाठीच संघटन बांधणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सात पैकी किमान पाच विधानसभा शिवसेनेला काबीज करावयाच्या आहे. पक्षात १० ते १५ वर्षांपासून काम करणारी माणसे एकही जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती आणू शकत नाही अशांनी आता बाजुला व्हावे अथवा कामात सुधारणा करावी असा इशाराही खासदार गजानन कीर्तीकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.
या विधानसभेत पुसदमध्ये मनोहर नाईकांनी शिवसेनाच खिशात टाकल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यापुढे कदापीही उमेदवार वेळेवर आयात केल्या जाणार नाही, असे कीर्तीकर यांनी स्पष्ट केले. सत्तेत असलो तरी जनतेच्या कामासाठी शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. संघर्षातून उभा ठाकलेला पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराघरात शिवसैनिक तयार करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार अनंत तरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, संतोष ढवळे, प्रवीण पांडे, बाबू पाटील जैत, किशोर इंगोले, गजानन डोमाळे, पराग पिंगळे, नगराध्यक्ष पवन जयस्वाल आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)