लोकसभेतील मतांवर विधानसभेचे गणित १६ मे रोजी फुगा फुटणार : युती-आघाडी धर्माचे वास्तव पुढे येणार
By Admin | Updated: May 10, 2014 00:30 IST2014-05-10T00:30:08+5:302014-05-10T00:30:08+5:30
लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतांची आघाडी मिळते यावर ...

लोकसभेतील मतांवर विधानसभेचे गणित १६ मे रोजी फुगा फुटणार : युती-आघाडी धर्माचे वास्तव पुढे येणार
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतांची आघाडी मिळते यावर आगामी विधानसभेतील उमेदवारी आणि मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे. सध्या प्रत्येकच आमदार आपल्या पक्षाला प्रचंड आघाडी मिळेल, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या या दाव्याचा फुगा १६ मे रोजी फुटणार आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार याबाबत गेल्या महिनाभरापासून तर्कवितर्क लावले जात आहे. राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती मोदी लाट, मोघेंचा नवा चेहरा, भावना गवळींची नाराजी, कुणबी, आदिवासी, बंजारा समाजाची गठ्ठा मते, अल्पसंख्यकांची मते, मतविभाजन असे वेगवेगळे निकष लावून अंदाज बांधत आहेत. आपलाच अंदाज कसा खरा ठरणार यासाठी जातीय समीकरणांचे पुरावेही देत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील माऊलच्या सुभाष पंडित शास्त्री यांनी तर शिवाजीराव मोघेच निवडून येणार अशी भविष्यवाणी केली आहे. तर भावना गवळी यांना आपल्या मतांची आघाडी ५० हजारापेक्षा अधिक असेल असा विश्वास आहे. सध्या एकूणच जर-तरवर अंदाज बांधले जात असले तरी प्रत्यक्ष निकालासाठी आता आणखी केवळ आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकालानंतर मात्र वास्तव उघड होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मतांची आघाडी मिळते यावर तेथील आमदारांचे वजन ठरणार आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथे सहा पैकी काँग्रेस व राष्टÑवादीचे प्रत्येकी दोन तर भाजपा व शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे. काँग्रेस-राष्टÑवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात शिवाजीराव मोघेंना किती मतांची आघाडी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातही सर्वाधिक लक्ष हे राळेगाव आणि पुसद विधानसभा मतदारसंघावर राहणार आहे. कारण हे दोन मतदारसंघच मोघेंचे लोकसभेतील भवितव्य ठरविणार आहे. अशीच स्थिती भावना गवळींबाबत दिग्रस विधानसभा मतदारसंघात आहे. तेथे शिवसेनेचे आमदार हे भावना गवळींना किती मतांची आघाडी मिळवून देतात याकडे नजरा लागल्या आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी येथे भाजपा-शिवसेनेचे वर्चस्व आहे. येथील मतांच्या आघाडीवर काँग्रेस आमदाराची लोकप्रियता ठरविली जाणार आहे. मतांच्या आघाडीवर आगामी विधानसभेची उमेदवारी ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. भावना गवळींसाठी भाजपाने आणि मोघेंसाठी राष्टÑवादीने युती-आघाडीचा धर्म पाळला का हे १६ मेनंतर स्पष्ट होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)