शेषराव पाटील जिनिंगची आमसभा वादळी
By Admin | Updated: September 29, 2016 01:23 IST2016-09-29T01:23:05+5:302016-09-29T01:23:05+5:30
येथील शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगची बुधवारी झालेली वार्षिक आमसभा वादळी ठरली.

शेषराव पाटील जिनिंगची आमसभा वादळी
अध्यक्षांना घेराव : भूखंड लाटण्याचा डाव हाणून पाडला
पुसद : येथील शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगची बुधवारी झालेली वार्षिक आमसभा वादळी ठरली. या बैठकीत सभासदांनी अध्यक्षांना घेराव घातला, तर संस्थेचे सदस्य मांगिलाल चव्हाण यांनी जिनिंगच्या भूखंडाची विक्री करताना माजी बोली १०० कोटीपासून सुरू होईल, अशी घोषणा केली. यामुळे सत्ताधाऱ्यांचा भूखंड लाटण्याचा डाव एक प्रकारे हाणून पाडला.
पुसद येथील शेषराव पाटील जिनिंगच्या आमसभेत येथील कारला मार्गावरील जिनिंग फॅक्टरी क्र.१ ची जमीन व मशनरी विकण्याची परवानगी पणन संचालकांकडून घेतली आहे. संस्थेने चार हेक्टर पाच आर एवढा भूखंड १५ कोटी ३५ लाख २५ हजार रुपयांचे मूल्यांकन दुय्यम निबंधकांनी केले आहे. या मूल्यांकनावर आक्षेप घेतल्यानंतर सदर भूखंडाचे मूल्यांकन १५ वरून २२ कोटी ५१ लाख रुपये झाले. यावरही आक्षेप घेतला. फेरमूल्यांकन करण्यात आले. त्यात २९ कोटी १६ लाख रुपये बाजारमूल्य निर्धारित केले. यावरही सभासदांचे समाधान झाले नाही. त्यांनी पणन महासंचालकांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर संस्थेने शासकीय नोंदणीकृत ठेकेदार अधिकृत मूल्यांकन करून घेतले. त्यात २९ वरून ३२ कोटी ४० लाख रुपये बाजारमूल्य निर्धारित करण्यात आले. १६ कोटींची मालमत्ता ३२ कोटींवर नेण्याचे श्रेय जागरूक सभासदांना जाते.
यासंदर्भात २७ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये ‘सव्वाशे कोटीचे भूखंड केवळ १६ कोटीला’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्तात तीन वर्षांपूर्वी नाईक चौकातील नगरपरिषदेचा पाच हजार चौरस फूट भूखंड या दराने विकण्यात आला होता. जिनिंगचा भूखंड हा बसस्थानकाजवळ मुख्य मार्गाला लागून आहे. या भूखंडाचा आताचा बाजारभाव पाच हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. तेव्हा चार हजार हेक्टर पाच आर एवढा भूखंड बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होतो. ही बाब ‘लोकमत’ने उघड केली होती.
त्यानुसार बुधवारी झालेल्या जिनिंगच्या सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य मांगिलाल चव्हाण यांनी भूखंडाची विक्री करताना आपली पहिली बोली १०० कोटींपासून राहील, असे सांगितल्याने संचालकांना हादरा बसला. त्यानंतर अनेक सभासद बोलण्यासाठी उठले असता, त्यांना बोलू दिले नाही. अखेरीस सभासदांनी अध्यक्ष विजय चव्हाण यांना घेराव घातला. तब्बल एक तास सभेचे कामकाज चालले. नवीन सभासद नोंदणी करा, भूखंड विक्रीची नोटीस सर्व सभासदांना देण्यात यावी, अशी मागणी संजय लोंडे यांनी केली. संस्थेचे माजी सभासद ज्ञानेश्वर तडसे यांना बोलूच दिले नाही. सभासदांनी सभेत गोंधळ घातला. त्यामुळे सभा तहकूब झाली. (तालुका प्रतिनिधी)