Balasaheb knows the public issues | बाळासाहेबांना जनसमस्यांची जाण
बाळासाहेबांना जनसमस्यांची जाण

ठळक मुद्देकीर्ती गांधी : शेतकरी विधवांचा सन्मान, शरीरसौष्ठव स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काँग्रेस पक्षाचा अग्रणी कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांनी भूमिका बजावली आहे. तीन दशकाहून अधिक काळ निस्वार्थ सेवा करणारा हा सेवाव्रती आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्यांची जाण त्यांना आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या एकसष्टी कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेब फॅन्स क्लबच्यावतीने येथील मेडिकल चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकरी विधवांचा साडीचोळी आणि ब्लँकेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, प्रताप पारसकर, मुकेश देशभ्रतार, मिलिंद रामटेके आदी उपस्थित होते.
किशोर दर्डा म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊन बाळासाहेब मांगुळकर यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली. हा पराभवानंतरही मिळालेला खरा विजय आहे. त्यांनी छोटा, मोठा असा भेदभाव न करता सर्वांची कामे केली. यामुळे त्यांचे आजही प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. काम करण्याची धडाडी, पाठपुरावा हे बाळासाहेबांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे भारी या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, असे ते म्हणाले.
राहूल ठाकरे म्हणाले, बाळासाहेब मांगुळकर यांचा मोठा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी विविध विकास कामे केली. लोकांच्या समस्या त्यांनी गांभीर्याने घेत निकाली काढल्या. अशा या नेत्याने मोठी उंची गाठावी, असे मत नोंदविले.
यावेळी बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले. बाबुजींचे विचार सदैव प्रेरणादायी राहिले असे ते म्हणाले.
यावेळी गावखेड्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नगरसेवकांनी बाळासाहेबांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले. आभार मिलिंद रामटेके यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Balasaheb knows the public issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.