बहुजनांची जिल्हा कचेरीवर धडक
By Admin | Updated: June 19, 2017 00:47 IST2017-06-19T00:47:26+5:302017-06-19T00:47:26+5:30
शेतकरी व बहुजन समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

बहुजनांची जिल्हा कचेरीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकरी व बहुजन समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. विविध संघटनांच्या पुढाकारात येथील पोस्टल मैदानातून काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चात नागरिक सहभागी झाले होते.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, ओबीसीची जातनिहाय जनगणना करून आरक्षण द्यावे, आदिवासींना पाचवी आणि सहावी अनुसूची लागू करावी, मुस्लीमांना सच्चर कमीशन लागू करावे, महिलांना सुरक्षितता द्यावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हा कचेरीजवळ विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले.
भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शेगेकर म्हणाले, शोषितांनी एक होऊन लढा दिल्याशिवाय आमचे संविधानिक हक्क मिळणे कदापी शक्य नाही. म्हणूनच सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, यासाठी १०० दिवसात पाच करोड लोकांच्या सह्या घेऊन राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्याच्या अभियानाचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. ईव्हीएम बंद न केल्यास देशभर ५५० जिल्ह्यात एकाच दिवशी रास्ता रोको, रेल रोको, जेलभरो आदी प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती शेगेकर यांनी दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर, कैलास भोयर, कुंदाताई तोडकर, इंदुताई मोहर्लीकर, सतीश तिरमारे, हिम्मत भगत, कुणाल वासनिक, वनिता कदम, सारिका भगत आदींची उपस्थिती होती.