नेर येथे बहुजन क्रांती मोर्चा
By Admin | Updated: May 30, 2017 01:18 IST2017-05-30T01:18:39+5:302017-05-30T01:18:39+5:30
बहुजनांच्या प्रश्नांना घेवून येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ...

नेर येथे बहुजन क्रांती मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : बहुजनांच्या प्रश्नांना घेवून येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
देशात एससी, एसटी, ओबीसी, बारा बलुतेदार, व्हीजेएनटी, एलबीसी, अल्पसंख्यक, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, लिंगायत यांच्या संवैधानिक हक्क अधिकारांसाठी एकच पर्व-बहुजन सर्व या संकल्पनेतून हा मोर्चा काढण्यात आला होता.
तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, अहल्याबाई होळकर यांच्या विचार प्रतिमांसह अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. विविध रंगाचे झेंडे आणि मागणी फलक घेवून नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
शेतकरी कर्जमाफी, ओबीसी गणना, व्हीजेएनटीलाही अॅट्रॉसिटी संरक्षण, आदिवासींसाठीची अनुसूची पाच व सहा लागू व्हावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, निवडणुकीत इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा, ब.मो. पुरंदरे यांना दिलेला पुरस्कार काढून घ्यावा, अल्पसंख्यकांसाठी कम्युनल राईट्स प्रोटेक्शन अॅक्ट बनविण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला शरद मोरे, सुकलाल देशपांडे, तारिक सईद खान, अविनाश शेंडे आदींनी संबोधित केले. संचालन मोर्चाचे संयोजक अशोक खोब्रागडे, तर आभार सहसंयोजक विनायकराव भोयर यांनी मानले. तहसीलदारांना निवेदन देताना सुभाष गायकवाड, लक्ष्मण वानखडे, नीलेश वाहाने, वंदना मिसळे, रत्नमाला मिसळे, चंदा मिसळे, संघमित्रा गायकवाड, वासुदेव शेंडे, किशोर सांडे, सुनील गवई, रूपेश मिसळे, पंकज रंगारी, शुभम मिसळे, देवानंद ढोके, प्रमोद गायकवाड, विशाल गोंडाने आदी उपस्थित होते.