अतिक्रमणधारकांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:23 IST2018-03-18T23:23:15+5:302018-03-18T23:23:15+5:30
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. यात कळंब व चापर्डा येथील अतिक्रमणधारकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

अतिक्रमणधारकांचे उपोषण मागे
ऑनलाईन लोकमत
कळंब : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. यात कळंब व चापर्डा येथील अतिक्रमणधारकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या लोकांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागण्या मान्य झाल्याने रविवारी मागे घेण्यात आले.
येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपनगराध्यक्ष मनोज काळे यांची उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी आशिष धोबे, विनोद शेंडे यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत सर्वांना योग्य मोबदला दिला जाईल, बेघर होणाऱ्यांना घरकुलामध्ये प्राधान्य देण्यात येईल. यासह इतर मागण्या लेखी स्वरुपात मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आमदार डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन उपोषण मागे घेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, मुन्ना लाखीयाँ, रुपेश राऊत, मंडळ अधिकारी राजेश शिंदे आदी उपस्थित होते.
महिला व मुलांचाही सहभाग
चापर्डा व कळंब माथा वस्तीमधील घरे रस्त्याच्या कामात उद्ध्वस्त होत आहे. अशा कुटुंबातील महिला, लहान मुलेही उपोषणात सहभागी झाले होते. त्यांना वातावरणातील बदलाचा मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु शेवटी मागण्या मान्य झाल्याने सर्वांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता.