नेर येथील लाचखोर वनपालाला कारावास
By Admin | Updated: December 23, 2016 02:19 IST2016-12-23T02:19:30+5:302016-12-23T02:19:30+5:30
शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी

नेर येथील लाचखोर वनपालाला कारावास
एक वर्ष : वृक्षतोड परवान्यासाठी लाच
यवतमाळ : शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी नेर येथील वनपालाला जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.
सुधीर लक्ष्मणराव इंगोले, नेर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे दिलीप धुमाजी जाधव, रा. मालखेड या शेतकऱ्याने शेत गट नं. ८० मधील सागवान झाडाची तोड करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी त्याने शेतकऱ्याला एक हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत शेतकऱ्याने तक्रार नोंदविली. त्यावरून २४ मार्च २०११ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नेर येथील वन नाक्यावर वनपालाला लाच घेताना रंगेहात पकडले होते.
या खटल्यात दिलीप जाधव, संजय गंधरवार, मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, एसीबीचे उपअधीक्षक ए.डी. जहरवाल यांची साक्ष ग्राह्य धरीत जिल्हा सत्र न्यायाधीश द्वितीय ए.एस. वाघमारे यांनी आरोपीला एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात विजय तेलंग यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद केला. (कार्यालय प्रतिनिधी)