आयजींच्या पोलीस दरबारात बाबुगिरी गाजली
By Admin | Updated: February 7, 2015 01:37 IST2015-02-07T01:37:54+5:302015-02-07T01:37:54+5:30
जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण अंतिम टप्प्यात आले असताना प्रघाताप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी शुक्रवारी सकाळी येथील मुख्यालयात पोलीस दरबार भरविला होता.

आयजींच्या पोलीस दरबारात बाबुगिरी गाजली
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण अंतिम टप्प्यात आले असताना प्रघाताप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी शुक्रवारी सकाळी येथील मुख्यालयात पोलीस दरबार भरविला होता. यावेळी पोलीस प्रशासनातील बाबुगिरीच्या कारभाराचा अनेकांनी पाढाच वाचला. तसेच पतसंस्थेच्या कारभारावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलीस मुख्यालयामागील देशी दारू दुकानाचा प्रश्नही गाजला. कर्मचाऱ्यांच्या आक्रमकतेने पोलीस महानिरीक्षकांचा हा दरबार चांगलाच वादळी ठरला.
जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षणासाठी ४ फेब्रुवारीपासून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे येथे पथकासह तळ ठोकून आहे. दोन पोलीस ठाणे आणि दोन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, या व्यतिरीक्त महत्वाच्या पोलीस शाखा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे निरीक्षण त्यांनी आटोपले. त्यानंतर शुक्रवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मंडप उभारून पोलीस दरबार भरविण्यात आला. दरबाराला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक उघडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, पाचही उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार उपस्थित होते. सुमारे दीड तास चाललेल्या पोलीस दरबारात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्यात. त्यामध्ये खात्याचीच लिपिकवर्गीय यंत्रणा कर्मचाऱ्यांचा कसा छळ करीत आहे. याचा पाढाच वाचण्यात आला. कुठलीही देयके वेळेत निकाली निघत नाही, पैसे दिल्याशिवाय कामे होत नाही, असे विविध आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केले. त्यावर पोलीस महानिरीक्षक उघडे यांनी लिपिकवर्गीय यंत्रणेला चांगलेच खडसावले. तसेच कामकाज आणि वागणुकीत सुधारणा करण्याची तंबीही दिली. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने पतसंस्थेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सभासद असूनही कर्ज मिळत नाही. कर्ज देताना जवळचा- दूरचा असा दुजाभाव केला जातो, असे विविध आरोप केले. त्यावर पतसंस्थेच्या संचालक मंडळालाही कर्मचाऱ्यांची गरज समजून घ्या. त्यांची कर्ज मागणीची प्रकरणे वेळेत निकाली काढा, अशा सूचना देण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्याने अगदी पोलीस मुख्यालय आणि शासकीय निवासस्थानांच्यामागेच देशी दारु दुकान असल्याचे या दरबारात महानिरीक्षकांना सांगितले. वसाहतीला सुरक्षा भिंत नसल्याने मद्यपी थेट वसाहतीतून ये-जा करतात. एवढेच नव्हे तर या दारू दुकानासमोर नेहमीच मद्यपींची भांडणे होतात. तेव्हा अश्लिल शिवीगाळ थेट घरात ऐकू येतो. लहान मुलांवरही त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यावर सुरक्षा भिंत आणि देशी दारू दुकान इतरत्र हलविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना महानिरीक्षकांनी दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
कनव्हेक्शन रेट वाढवा महानिरीक्षकांच्या ठाणेदारांना कानपिचक्या
पोलीस दरबार आटोपल्यानंतर पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी मुख्यालयाच्या सभागृहात पोलीस अधिकाऱ्यांची क्राईम मिटींग घेतली. यावेळी निरीक्षणादरम्यान आढळलेल्या अनेक अनागोंदीवरून ठाणेदारांसह पोलीस अधिकाऱ्याच्या त्यांनी कानपिचक्या घेतल्या. तसेच कनव्हेक्शन रेट (शिक्षेचे प्रमाण), शेती साहित्याची चोरी, वॉरंटची अंमलबाजवणी, कायदा आणि सुव्यवस्था, पैरवी अधिकाऱ्यांकडून साक्षीदारांचे होत नसलेले समूपदेशन यावरही नाराजी व्यक्त केली. कनव्हेक्शन रेट वाढावा यासाठी सबळ पुरावे असलेल्या गुन्ह्यांचे दोषारोपत्र दाखल करावे. अन्यथा बी-फायनल करून प्रकरण बंद करण्याच्या सूचना दिल्या. पैरवी अधिकाऱ्यांनी साक्षीदार फितूर होणार नाही याची काळजी घ्यावी. वॉरंटच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी सतर्क रहायला हवे अशा विविध सूचना केल्या. मात्र शहरासह जिंल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत त्यांनी बोलणे टाळले.