बाभूळगाव कोरोना नियंत्रण समितीने लाॅकडाऊनचा विषय लोकांवर सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:07+5:30
नियम न पाळणाऱ्या लोकांसह आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश नायब तहसीलदार निवल यांनी यावेळी दिले. पुढील आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मात्र, लोक नियम पाळणार नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी यावेळी मांडले.

बाभूळगाव कोरोना नियंत्रण समितीने लाॅकडाऊनचा विषय लोकांवर सोडला
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : कोरोनाचा वाढता आलेख आणि तहसीलदारांच्या अहवालावर लॉकडाऊनचा निर्णय या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी कोरोना नियंत्रण समितीची तालुकास्तरीय सभा घेण्यात आली.
यावेळी मंचावर नायब तहसीलदार वाय. ए. निवल, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी महेश जामनोर, पंचायत समिती सभापती रोशनी ताडाम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, उपसभापती सीमा दामोधर, माजी सभापती गौतम लांडगे, माजी उपसभापती हेमंत ठाकरे, नीलेश दंदे आदी उपस्थित होते.
नियम न पाळणाऱ्या लोकांसह आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश नायब तहसीलदार निवल यांनी यावेळी दिले. पुढील आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मात्र, लोक नियम पाळणार नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी यावेळी मांडले.
सध्या सुरू असलेली व्यवहाराची वेळ ९ ते ५ हीच कायम ठेवावी, असे मत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रकाशचंद छाजेड यांनी व्यक्त केले. कोपरा (बारड) येथील ३० वर्षीय मुलाचा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याचे सुरू असलेले औषध थांबविले होते. याविषयी माजी सभापती गौतम लांडगे यांनी नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल होतात. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये, असे सभापती राेशनी ताडाम यांनी सांगितले.
आठवडी बाजार बंद करावा, असे यावेळी ठरले. सभेला प्रकाशचंद छाजेड, अनिकेत पोहेकर, शहजाद शेख, राजू नवाडे, धीरज रूमाले, ओमप्रकाश गुप्ता, शेख रफिक, शोयब घाची, आनंद घटे आदी उपस्थित होते.