विचार पुढे नेणे हीच बाबासाहेबांना आदरांजली
By Admin | Updated: November 5, 2015 02:50 IST2015-11-05T02:50:12+5:302015-11-05T02:50:12+5:30
ज्यांच्या पायाला हात लावावा, असे व्यक्तिमत्त्व आज दुर्मिळ आहे. बाबासाहेब घारफळकर तसेच होते. त्यांनी आयुष्यभर

विचार पुढे नेणे हीच बाबासाहेबांना आदरांजली
आरिफ अली ल्ल घारफळ (बाभूळगाव)
ज्यांच्या पायाला हात लावावा, असे व्यक्तिमत्त्व आज दुर्मिळ आहे. बाबासाहेब घारफळकर तसेच होते. त्यांनी आयुष्यभर तळागळातल्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी संघर्ष केला. भाऊसाहेब उपाख्य डॉ.पंजाबराव देशमुख यांचा वारसा बाबासाहेबांनी पुढे नेला. आता बाबासाहेबांचा विचार, त्यांची तळमळ पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी काढले.
बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे बाबासाहेब घारफळकर जन्मशताब्दी सोहळ्यात बुधवारी ते बोलत होते. शिक्षणमहर्षी रा. ज. उपाख्य बाबासाहेब घारफळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. त्याचवेळी श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे स्व. बाबासाहेब घारफळकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असे नामांतरणही करण्यात आले. यावेळी शाळेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजनही शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरूण शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, प्रमुख वक्ते म्हणून खासदार भावनाताई गवळी, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार मनोहरराव नाईक, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री संजय देशमुख, माजी आमदार कीर्ती गांधी, प्राचार्य शंकरराव सांगळे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, बाबासाहेब घारफळकर या सत्पुरुषाविषयी बोलण्यासाठी आपण येथे उभे आहोत याचाच वेगळा आनंद वाटतो. मी मुख्यमंत्री असताना बाबासाहेबांनी कधीच कोणतेही पद मागितले नाही, सवलत मागितली नाही. पण दोन गोष्टींसाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा. एक म्हणजे, कापूस उत्पादकांना न्याय मिळावा आणि दुसरे म्हणजे, शिवाजी शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी शक्य ती मदत करा. ही संस्था त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. खेड्यापाड्यातील मुले शिक्षित झाली पाहिजे, हीच बाबासाहेबांची तळमळ होती. सदैव त्याग करण्यासाठी तत्पर असणाऱ्या बाबासाहेबांनी एकदा माझ्याकडे नागपूर विद्यापीठात जाण्याची इच्छा व्यक्त केली. मला आश्चर्य वाटले. पण त्यावेळी बहुजनांना या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी संधीच नव्हती. भाऊसाहेब (डॉ. पंजाबराव देशमुख) आणि भाऊसाहेब कोलते यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. बाबासाहेबांनी शेवटी नागपूर विद्यापीठात प्रवेश केलाच आणि पुढे बहुजन कुलगुरूही केले.
अॅड. अरूण शेळके म्हणाले, बाबाजींचा पुतळा नव्या पिढीला शिक्षणाची सदैव प्रेरणा देणार आहे. बाबासाहेबांनीच शिवाजी शिक्षण संस्थेला स्थैर्य दिले. आज बहुजनांची पिढी गारद करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासाठी विचारांची क्रांती गरजेची आहे, असे ते म्हणाले. प्राचार्य शंकरराव सांगळे यांनी बाबासाहेब घारफळकर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. बाबासाहेब घारफळकर यांच्यावर महात्मा गांधीचा मोठा प्रभाव होता, असे माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांनी सांगितले. माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, बाबासाहेब हे दीपस्तंभासारखे होते. खासदार भावना गवळी, संजय धोत्रे यांनीही विचार मांडले. तर बाबासाहेबांचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव घारफळकर यांनी भूमिका विशद केली. संचालन साहेबराव कडू यांनी केले. तर आभार विनोद कडू यांनी मानले. कार्यक्रमाला सरपंच चंद्रशेखर ठाकरे, अमर घारफळकर, धनराज छल्लाणी आदी उपस्थित होते. बाबासाहेब घारफळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावेळी शरद पवार यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. बाबासाहेबांचे शिल्प घडविणाऱ्या सातारकर-फाळके या शिल्पकार जोडीचा व कृष्णा कडू, ओमप्रकाश राठी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विजय दर्डा यांचा शुभेच्छा संदेशही आला. यावेळी जिल्हाभरातील विविध राजकीय पक्षांतील मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी व विदर्भभरातून आलेले बाबासाहेबांचे चाहते उपस्थित होते.
चार लाखांचे वेतन घरातून, कर्जदारांना माफी खिशातून
घारफळसारख्या छोट्या गावात जन्मून यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी नगराध्यक्ष होणे सोपे नव्हते. पण बाबासाहेब घारफळकर यांनी ते शक्य केले. आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी केली, ती शासकीय खजिन्यातून केली होती. पण बाबासाहेबांनी त्या काळात आजूबाजूच्या गावातील आपल्या कर्जदारांना घरी बोलावून त्यांच्यावरील कर्ज माफ करून टाकली. त्यांची ती कर्जमाफी त्यांनी कष्टाने कमावलेल्या खिशातील पैशातून होती. ते घारफळमध्ये जन्मले हे या गावाचे भाग्य, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले. तर प्राचार्य शंकरराव सांगळे यांनी सांगितले की, बाबाजी यवतमाळचे नगराध्यक्ष असताना नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती वाईट होती. त्यावेळी बाबाजींनी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित चार लाखांचे वेतन स्वत:च्या घरातून दिले.