बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता दिली

By Admin | Updated: April 9, 2015 00:02 IST2015-04-09T00:02:57+5:302015-04-09T00:02:57+5:30

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात कोणतीही शस्त्र न घेता देशात वैचारिक क्रांती घडवून आणली.

Babasaheb gave independence, equality and brotherhood | बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता दिली

बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता दिली

प्रदीप आगलावे : धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे थाटात उद्घाटन, विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका
पुसद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हातात कोणतीही शस्त्र न घेता देशात वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यामुळे ते विसाव्या शतकातील महान क्रांतिकारक होते. बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्य दिली. भारतातील राष्ट्रवाद हा मानवतावादावर उभा केला, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रा.डॉ.प्रदीप आगलावे यांनी केले.
स्थानिक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात मंगळवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्व-२०१५ चे उद्घाटन झाले. यावेळी ‘आंबेडकरी विचारातून राष्ट्रीयता आणि सद्यस्थिती’ या विषयावर बीज भाषण देताना डॉ.आगलावे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे होत्या. धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखेडे, फकिरराव वाढवे, विश्वनाथ कांबळे, कालू पहेलवान डंगोरिया, अर्जुनराव लोखंडे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त करताना बाबासाहेबांचे संविधान समजून घेतल्याशिवाय समाजात जागृती होणार नाही, असे म्हटले. या कार्यक्रमाला भीमराव कांबळे, बंडू राऊत, संभाजी ब्रिगेडचे सुधीर देशमुख, प्रा.दादाराव अगमे, यादव जांभुळकर, प्रा.महेश हंबर्डे, अरविंद चव्हाण, अनिल चेंडकाळे, प्रा.दिनकर गुल्हाने, संतोष गायकवाड आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

अभ्यासिकेचे लोकार्पण
येथील लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने समाजातील गरीब, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञासूर्य स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासिकेचा मोफत लाभ मिळणार आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखडे, प्रा.विलास भवरे, दीपक मेश्राम, गणेश वाठोरे, दादाराव अगमे, भगवान हनवते, काशीनाथ मुनेश्वर, प्रभाकर गवारगुरू, प्रा.संजय खुपसे, संतोष गायकवाड, प्रा.महेश हंबर्डे, प्रा.डॉ.साखरकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Babasaheb gave independence, equality and brotherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.