बाबांना आम्हा तीन बहिणीच्या लग्नाची काळजी होती
By Admin | Updated: February 7, 2015 01:43 IST2015-02-07T01:43:45+5:302015-02-07T01:43:45+5:30
बाबा गेले. त्यांच्या जाण्याने प्रश्न सुटले नाही तर वाढणार आहे. आमची बाबाला काहीच मागणी नव्हती. परिस्थितीशी दोन हात करायला आम्ही बहिणी ....

बाबांना आम्हा तीन बहिणीच्या लग्नाची काळजी होती
महागाव : बाबा गेले. त्यांच्या जाण्याने प्रश्न सुटले नाही तर वाढणार आहे. आमची बाबाला काहीच मागणी नव्हती. परिस्थितीशी दोन हात करायला आम्ही बहिणी आणि आई तशाही शिकलोच होतो. गेल्या आठ दिवसांपासून बाबांच्या डोक्यात काही तरी वेगळा विचार सुरू असावा. मात्र ते कधी चेहऱ्यावर येऊच देत नव्हते. एवढे मात्र खरी की आम्हा तीन बहिणीच्या लग्नाची काळजी बाबाला लागली असावी आणि त्यातूनच त्यांनी या जगाचा निरोप घेतला असावा, असे डोळ्यात अश्रू आणून त्या तिघी बहिणी सांगत होत्या.
महागाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी आनंदराव साहेबराव पंडागळे (४५) यांनी बुधवारी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. पाच एकरात केवळ तीन क्ंिवटल कापूस झाल्याने आपल्या उपवर तीन मुलींचे विवाह कसे करावे या विवंचनेत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नापिकी आणि कर्जबाजारीपणाने स्वत:चे सरण रचून या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. प्रस्तूत प्रतिनिधीने पंडागळे कुटुंबाची भेट घेतली असता त्यांच्या तीनही मुली डोळ्यात अश्रू आणून वडील जाण्याचे दु:ख सांगत होते. नेहा (१८), गायत्री (१५) आणि पूजा (१३) या मुलीसह पत्नी सुलोचना यांच्या समोर भविष्याच्या काळजीचे काळे ढग निर्माण झाले आहे. मोठी मुलगी नेहा म्हणाली, बाबांना एका पाठोपाठ एक लग्नाला येत असलेल्या आम्ही तीन बहिणी दिसत होतो. त्यामुळे शेतीवर जास्त भर देऊन त्यांनी अधिकचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कष्ट आम्ही अगदी जवळून पाहिले. कापसाच्या उत्पादनातून मुलीचे हात पिवळे करता येईल, असा त्यांचा विचार होता. मात्र कापसाने दगा दिला. निसर्ग साथ देत नाही. लग्नाचे दिवससुद्धा जवळ आले. काय कराव बाबांना सूचत नव्हते. यातच त्यांनी टोकाची भूमिका घेतली. संसारातून कायमची मुक्ती मिळविली. मात्र आम्ही तीन बहिणी आणि आई आता बाबाला पोरक्या झालो. नेहा हे सांगत असताना आई सुलोचनाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ती म्हणाली, आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे आत्महत्या हा काय पर्याय झाला का असे ती माऊली म्हणत होती.
नेहा, गायत्री आणि पूजा या तिघीही बहिणी टेंभीच्या शाळेत शिकत आहे. वडिलांनी आत्मदहन केले त्यावेळी तिघीही बहिणी शाळेत होत्या. तर सुलोचनाबाई शेतात गेल्या होत्या.
आनंदरावने घरातच दार बंद करून अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. बाबांच्या आठवणींनी या तीन बहिणी आणि आईला बोलताही येत नाही. आनंदराववर फुलसावंगी सेंट्रल बँकेचे ५० हजार तर खासगी सावकाराचे कर्ज आहे. शेतीच्या भरोश्यावर कर्ज कसे फेडायचे आणि मुलीचे शिक्षण आणि लग्न कसे करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने या जगाचा निरोप घेतला. (शहर प्रतिनिधी)