देशाच्या एकसंघतेत बाबासाहेबांचे मोलाचे योगदान

By Admin | Updated: April 24, 2016 02:33 IST2016-04-24T02:33:41+5:302016-04-24T02:33:41+5:30

मोठा भौगोलिक विस्तार असलेला भारत विविधतेसाठी प्रसिद्धच आहे. पण या वैविध्यपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्यासाठी

Baba Saheb's contribution in the country's unity | देशाच्या एकसंघतेत बाबासाहेबांचे मोलाचे योगदान

देशाच्या एकसंघतेत बाबासाहेबांचे मोलाचे योगदान

वकील संघातर्फे जयंती सोहळा : न्यायमूर्तीद्वय भूषण गवई आणि प्रसन्न वराळे यांनी उलगडले घटनाकाराचे व्यक्तिमत्त्व
यवतमाळ : मोठा भौगोलिक विस्तार असलेला भारत विविधतेसाठी प्रसिद्धच आहे. पण या वैविध्यपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मार्गदर्शक तत्त्वातून विशेष तरतुदी केल्या आहेत. आजही आपला देश या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाटचाल करीत आहे, असे सांगत न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची महागाथा मांडताना बाबासाहेबांच्याच भाषणांतील, लेखनातील उद्गार त्यांनी जागोजागी उधृत केले. त्यामुळे वारंवार येणाऱ्या ‘‘बाबासाहेब म्हणाले की,..’’ ऐकताना यवतमाळकर प्रेक्षक भारावून गेले होते.
यवतमाळ जिल्हा वकील संघातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती समारोह थाटात पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप सिरासाव होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदिपे, यवतमाळ बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र ठाकरे यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
न्या. भूषण गवई म्हणाले की, घटना निर्मितीच्या प्रक्रियेतील बाबासाहेबांचे योगदान वादातीत आहे. देश एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात सामाजिक आणि आर्थिक समतेची बिजे रुजविली. त्यासाठीच नागरिकांना मुलभूत अधिकार देतानाच मार्गदर्शक तत्त्वेही घालून देण्यात आली आहे. संघराज्याची रचनाच त्यांनी अशा पद्धतीने केली आहे की, केंद्र राज्यांना योग्य स्वातंत्र्यही देईल; पण वेळप्रसंगी त्यांच्यावर नियंत्रणही ठेवू शकेल. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्य सरकारे असली, तरी संपूर्ण देशासाठी एकच न्यायपालिका आहे. कोणताही नागरिक हा एखाद्या राज्याचा नागरिक न राहाता संपूर्ण देशाचा नागरिक आहे. बाबासाहेबांनी अमेरिकेप्रमाणे भारतात दुहेरी नागरिकत्वाची संकल्पना स्वीकारली नाही. राज्य विधी मंडळे विविध कायदे बनवित असले तरी, महत्त्वाचे कायदे संपूर्ण देशासाठी सारखेच आहेत. इंडियन पीनल कोड किंवा टॅक्सेशन ही त्याची ठळक उदाहरणे. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी त्याला घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कारभार करावा लागतो. त्यामुळेच देश एकसंध राहू शकला. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्यासाठी रोल मॉडेल ठरणारी आहे. भारत आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसारच वाटचाल करीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनीही पदावर येताच म्हटले होते की, एक चहावाला पोरगा पंतप्रधान होऊ शकला तो बाबासाहेबांच्या संविधानामुळेच. बाबासाहेब हे व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांच्या नावाचा उदोउदो करतानाच त्यांचे विचारही पुढे नेले, तर खरी आदरांजली ठरेल, असे न्या. गवई यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप सिरासाव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक यवतमाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र ठाकरे यांनी केले.
सूत्रसंचालन अ‍ॅड. फिडेल बायदाणी यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. ए.पी. दर्डा, अ‍ॅड. भालेराव, अ‍ॅड. वाडवाणी, अ‍ॅड. आर.के. मनक्षे, अ‍ॅड. दिग्विजय गायकवाड, अ‍ॅड. गोविंद बन्सोड, अ‍ॅड. राजेंद्र राऊत, अ‍ॅड. रामदास राऊत, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. रवी अलोणे, अ‍ॅड. धनंजय मानकर यांच्यासह जिल्ह्यातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.
खूनप्रकरणातील निराधारांना भरपाई
जिल्ह्यातील दोन खून प्रकरणातील मृताच्या निराधार नातेवाईकांना यावेळी नुकसान भरपाईचे धनादेश वितरित करण्यात आले. जिल्हा विधी सेवा समितीतर्फे ही मदत शेख रहीम शेख रज्जाक, शहनाझ बी शेख रहीम, रशीद खान, नझीमा बी अहेमद खान, रिझवान खान इरफान खान यांना न्यायमूर्तींच्या हस्ते वितरित करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
बाबासाहेब नवसमाज निर्मितीचे शिल्पकार - प्रसन्न वराळे
न्या. प्रसन्न वराळे म्हणाले की, संविधानाच्या रूपाने मोठे कार्य करून गेलेले बाबासाहेब आंबेडकर हे नवसमाजनिर्मितीचे शिल्पकार आहेत. ज्ञानाची अशी एकही शाखा नाही, की जी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने झळाळलेली नाही. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्याखाली ‘सिम्बॉल आॅफ नॉलेज’ असे लिहिण्यात आले आहे. याचा प्रत्येक भारतीयाने गर्व बाळगला पाहिजे. बाबासाहेबांनी आपले बहुतांश वैचारिक लिखाण इंग्रजीतून केले. पण जेव्हा त्यांना सर्वसामान्य माणसांशी संवाद साधायचा होता, तेव्हा त्यांनी पत्रकारितेचे माध्यम निवडले. पत्रकारितेतील त्यांचे लिखाण हे रांगडे, रोखठोक आहे. त्यात म्हणी, लोककथांचाही वापर आहे. तत्कालीन प्रस्थापित नेत्यांशी त्यांनी टोकाचा वैचारिक लढा दिला.
तीन गुरू, तीन मूल्ये
न्यायमूर्ती प्रसन्न वराळे म्हणाले की, गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना बाबासाहेब आपले गुरू मानायचे. त्याचप्रमाणे त्यांनी तीन मूल्ये शेवटपर्यंत जपली. ती म्हणजे, ज्ञान, स्वाभिमान आणि शील. या संदर्भात न्या. वराळे यांनी एक किस्सा सांगितला. माझे वडील भालचंद्र वराळे औरंगाबादमध्ये बाबासाहेब आले की, त्यांना भेटायला जायचे. एकदा बाबासाहेबांना भेटायला वडील व अन्य काही मित्र हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच हॉटेलमध्ये प्रसिद्धी अभिनेते दिलीपकुमारही उतरले होते. दिलीपकुमारने बाबासाहेबांची भेट घेतली. ‘तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, त्यातील काही गोष्टी अतिशय नितीमूल्ये पायदळी तुडविणाऱ्या आहेत.’ असे बाबासाहेबांनी दिलीपकुमार यांना स्पष्टपणे सांगितले. त्यावर नाराज झालेले दिलीपकुमार उठून गेले. एक मित्र बाबासाहेबांना म्हणाले, आपण ज्या संस्था उभारत आहोत, त्यासाठी या मोठ्या नटाची आर्थिक मदत झाली असते. त्यावर बाबासाहेब ताडकन् म्हणाले, ‘‘माझ्या संस्था मेल्या तरी चालतील, पण ज्यात शील पाळले जात नाही अशा क्षेत्रातला एक पैसाही घेणार नाही.’’

Web Title: Baba Saheb's contribution in the country's unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.