‘आयुर्वेद’चे कर्मचारी वेतनापासून वंचित

By Admin | Updated: August 26, 2014 00:15 IST2014-08-26T00:15:55+5:302014-08-26T00:15:55+5:30

येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Ayurveda's employees are deprived of salary | ‘आयुर्वेद’चे कर्मचारी वेतनापासून वंचित

‘आयुर्वेद’चे कर्मचारी वेतनापासून वंचित

प्रकाश लामणे - पुसद
येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भविष्य निर्वाह निधी व एलआयसीचे हप्ते थकले आहे. संबंधित कार्यालयाकडून व्यवस्थापनाला जाब विचारला जात असल्याने जुन्या व्यवस्थापनाने बँक खातेच सील बंद केले आहे. या प्रकाराने येथील कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे.
गजानन महाराज संस्थानद्वारा १९९२ पासून आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय चालविले जाते. या महाविद्यालयाचा कारभार गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुरता ढेपाळला आहे. कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होत नाही. भविष्य निर्वाह निधी व एलआयसीचे हप्ते भरले जात नाही. अगदी आर्थिक विवंचनेत फसलेल्या या महाविद्यालयात पुरेसा कर्मचारी वर्गसुद्धा नाही. त्यामुळे गजानन महाराज संस्थान या जुन्या व्यवस्थापनाने सदर महाविद्यालय तत्कालीन अध्यक्ष जयंत आडे व संचालक मंडळाने एका ठरावानुसार २००५ मध्ये जनता शिक्षण प्रसारक मंडळ या नव्या व्यवस्थापनाकडे चालविण्यास दिले. या संस्थेचे अध्यक्ष जय नाईक आहेत, हे विशेष.
नवीन संचालक मंडळ येऊनही महाविद्यालयाच्या परिस्थितीत बदल झाला नाही. आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे २७ महिन्याचे पगार थकीत आहे. सात वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी, एलआयसी, बँक कर्ज हप्ते भरले गेले नाही. त्यामुळे आयुर्वेद महाविद्यालय कुणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्या हक्काच्या पगाराबाबत कर्मचारी दोनही व्यवस्थापनांना विनवणी करतात. परंतु उडवाउडवीची उत्तरे दिली जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलन, संप, बहिष्कार आदी करीत आहे.
मात्र कोणताही परिणाम दोनही व्यवस्थापनावर झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यात असंतोष घुमसत आहे. आता अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी उपाययोजना करावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहे. सध्या तरी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी महासंघाचे डी.एम. वाणी, एस.जी. हिवरकर, एस.सी. देशमुख, एस.एस. पडघने, एम.एम. राठोड, साजिद अहमद, एम.डी. जाधव, बी.बी. चाकीलवार, जी.जी. मोरे, आय.पी. जाधव, व्ही.एम. टोपणे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार व इतर समस्यांबाबत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रस्तूत प्रतिनिधीने जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. सध्या मी स्वत: व माझी आई आजारी आहे. आपणाशी जास्त बोलू शकत नाही. मी आपल्याला नंतर फोन करतो, असे सांगितले. तर आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुंबळे म्हणाले, आयुर्वेद महाविद्यालयावर सध्या जय नाईक यांचे व्यवस्थापन आहे. जुने व्यवस्थापन गजानन महाराज संस्थान २४ आॅगस्ट रोजी कॉलेजमध्ये गेल्याचे समजले. मी सध्या बाहेरगावी असल्याने अधिक माहिती सांगण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ayurveda's employees are deprived of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.