विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अभिमत विद्यापीठाशी संलग्न आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनींना शासनाने उच्चशिक्षणात मुलींसाठी जाहीर केलेल्या सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. राज्यभरातील चार अभिमत विद्यापीठांतर्गत पाच महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या सहाशेहून अधिक विद्यार्थिनींना ही सवलत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना लाखो रुपये खर्च करून आयुर्वेदाचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागत आहे.
अनुदानित, शासकीय आणि विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थिनींकरिता शासनाच्या दि. ८ जुलै२००४ च्या शासन निर्णयानुसार लाभदिला जात आहे. परंतु अभिमत विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना यापासून दूर ठेवले गेले आहे. राज्यभरातील पाचही विद्यापीठाची मुले आणि मुली मिळून ९००हून अधिक विद्यार्थी संख्या आहे. यातील मुलींचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जवळपास ७०० विद्यार्थिनींना या सवलतीला लाभ मिळालेला नाही.
अभिमत विद्यापीठाशी संलग्न विदर्भात एक महाविद्यालय आहे. पुणे जिल्ह्यातील तीन तर अहिल्यानगर जिल्ह्यात एक असे एकूण पाच आयुर्वेद महाविद्यालय संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आर्थिक अडचणी सहन करीत स्वतः सह पालकांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरवर्षी पाच लाखांचा खर्चअभिमत विद्यापीठाशी संलग्न आयुर्वेद महाविद्यालयात पदवीचे (बीएएमएस) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी किमान पाच लाख रुपये खर्च येतो, तर पदव्युत्तर (पीजी) शिक्षण घेणाऱ्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना एका वर्षाचा ६ लाख ५० हजार रुपये एवढा खर्च सहन करावा लागतो. अनेक पालकांच्या आवाक्याबाहेर हा खर्च जातो. त्यामुळे अनुदानित, शासकीय आणि विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयाप्रमाणेच सवलतीत शिक्षण मिळावे अशी अपेक्षा पालकांना आहे.
"अभिमत विद्यापीठांतर्गत आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या पालकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेद पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शासनाने शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवू नये."- डॉ. शुभम बोबडे, विभागीय सचिव, निमा स्टुडंट फोरम, महाराष्ट्र