पुरस्कारप्राप्त फुलसावंगी आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By Admin | Updated: March 1, 2016 02:03 IST2016-03-01T02:03:41+5:302016-03-01T02:03:41+5:30
फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबणाऱ्या हाताची महिमा राज्यात उमटली. त्यांची दखल शासनाने घेतली आहे.

पुरस्कारप्राप्त फुलसावंगी आरोग्य केंद्र वाऱ्यावर
निधीचा अभाव : जिल्हा आरोग्य यंत्रणेचा कारभार कारणीभूत
महागाव : फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबणाऱ्या हाताची महिमा राज्यात उमटली. त्यांची दखल शासनाने घेतली आहे. राज्यपालांनी गौरव केला. मात्र आता हे प्राथिमक आरोग्य केंद्र वाऱ्यावर दिसत आहे. मागूनही निधी मिळत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा तुघलकी कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा परिषद वर्तुळात होत आहे.
राष्ट्रीय कार्यात सदा अग्रेसर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात सर्वात मोठी ओपीडी काढणारे म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले. डॉक्टरांच्या सेवेचा एकीकडे पाठ थोपटून गौरव होत असताना त्यांच आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सोयी सुविधा मागूनही मिळत नाही. ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची नाळ याच प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आहे. आदिवासी मागास भागाचे प्रतिनिधित्व करणारे फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र शासन दरबारी निधी मागूनही दुर्लक्षित केल्या गेले आहे.
महागाव तालुक्यात सर्वात मोठे भौगोलिक कार्यक्षेत्र असलेल्या फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दगडथर, वडद आणि बिजोरा या उपकेंद्राचा समावेश होतो. विशेष म्हणजे फुलसावंगीसह सर्व उपकेंद्र मागास आदिवासी डोंगराळ भागात आहेत. डॉ. जब्बार पठाण, डॉ. नखाते आणि कर्मचारी सेवाभावीपणे रुग्ण सेवा करीत आहेत. डॉ. जब्बार पठाण कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणारे यशस्वी डॉक्टर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. श्रीमंत घरची मंडळी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घेतात. रोज ३०० ते ४०० रुग्णांची ओपीडी येथेच नोंदली जाते. राष्ट्रीय कार्य आणि रुग्णसेवा नित्याने होत असताना या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याच मूलभूत सुविधा नाहीत. जिल्हा परिषद सदस्या पंचफुलाबाई चव्हाण तसेच डॉ.बी.एन. चव्हाण यांनी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा पुरवण्यात याव्या म्हणून कित्येक वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना गळ घातली आहे. परंतु या ना त्या कारणाने येथे मागण्यात आलेला निधी फेटाळला आहे.
प्राथिमक आरोग्य केंद्रात पाणी नाही. रस्ते खराब झाले, रुग्णाला औषध साठा नाही, वॉलकंपाऊंड नसल्यामुळे आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णाला पिण्यास पाणी नाही, या सर्व समस्या दूर करण्यासाठी डॉ.बी.एन. चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अजूनही प्रयत्नशी आहेत. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या मागणी प्रतिसाद देत नाहीत. एकीकडे राज्यपालाने गौरवलेले प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्लक्षित केल्या जाते तर आवश्यकता नसताना अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रावर लाखो रुपयांची उधळन सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)