जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान

By Admin | Updated: February 17, 2017 02:26 IST2017-02-17T02:26:24+5:302017-02-17T02:26:24+5:30

जिल्हा परिषदेचे ५५ गट व १६ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी गुरूवारी एक हजार ७१२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.

Average 70 percent voting in the district | जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान

जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान

मारेगावात सर्वाधिक : बाभूळगाव तालुक्यात सर्वात कमी मतदान, २३ ला मतमोजणी
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे ५५ गट व १६ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी गुरूवारी एक हजार ७१२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ६५ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून तुरळक प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. आता आठवडाभराने २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५५, तर १६ पंचायत समितीच्या ११० जागांसाठी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेसाठी ३१५, तर पंचायत समितीसाठी ५९६ उमेदवार रिंगणात होते. सुरूवातीला संथगतीने मतदान सुरू झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, बसपा, गोंगपा, एमआयएम आणि स्थानिक विकास आघाड्या व अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून गुरूवारी नेमका कुणाला कौल दिला, हे मतमोजणीअंतीच स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात मतदानाचा जोर
मतदानासाठी ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी चांगलीच गर्दी होती. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा बघायला मिळाल्या. सायंकाळी ५ वाजता दिवसभराचे काम आटोपून आलेल्या मतदारांची मोठी गर्दी होती. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रे गर्दीने फुलून गेले होते. काही ठिकाणी ५.३० वाजतानंतर मतदान सुरू होते. निर्धारित वेळेत मतदान केंद्राच्या गेटमध्ये पोहोचलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून अनेक केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. अनेक युवकांसह वृद्धांनीही मोठ्या उत्साहाने मतदान केले. महागाव तालुक्यातील कोनदरी येथे दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर कलगाव येथे मशीनवर जोरजोरात हात मारणाऱ्या गजानन नवाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मतदार यादीत घोळ
मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह असल्याने मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी होती. मात्र काही मतदारांची नावेच यादीत नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावर आक्षेप, हरकती मागविल्या होत्या. मात्र आक्षेप, हरकती सादर करूनही अनेक ठिकाणी मतदार यादीतील चुका कायमच राहिल्याचे गुरूवारी उघड झाले. यादीत अनेकांचे नावच नव्हते. काहींचे छायाचित्र बदललेले होते. काहींचे आडनाव व नावही चुकीचे होते. यामुळे काही मतदान केंद्रांवर काही काळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. (लोकमत चमू)

शपथपत्राने उमेदवारांची पोलखोल
निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे शपथपत्र प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लावण्यात आले होते. यामुळे उमेदवारांची पार्श्वभूमि मतदारांपुढे उघड झाली. प्रचार काळात या उमेदवारांनी लपविलेल्या काही बाबी आज उघड झाल्याने उमेदवारांना चांगलीच धडकी भरली आहे. यामुळे त्यांचे विजयाचे गणीत बिघडण्याचा धोका वाढला आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव, शिक्षण, वार्षिक उत्पन्न, एकूण संपत्ती व त्यांच्यावर दाखल गुन्हे, यासोबतच थकित कर्जाचाही तपशील देण्यात आला. हा संपूर्ण तपशील बघून मतदार अवाक झाले. त्याचा मतदानावर परिणाम होण्याच्या भितीने अनेक उमेदवारांना धडकी भरली आहे. मतदानापूर्वी उमेदवारांबाबत चर्चा करणारे मतदार मतदानाच्या दिवशी त्यांच्या संपत्तीची चर्चा करताना आढळले.

आईच्या मृत्यूनंतरही बहीण-भावाने केले मतदान
महागाव : आईच्या मृत्यूचे आभाळभर दु:ख बाजूला सारुन बहीण-भावाने मतदान करून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचा परिचय महागाव तालुक्यातील सवना येथे आला. भागीरथाबाई भुजंगराव देशमुख यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या मृत्यूचे दु:ख असतानाही मुख्याध्यापक दिलीपराव देशमुख आणि मुलगी लीलाताई यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदनाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे दिलीपराव देशमुख हे निवडणुकीच्या कर्तव्यावर दगडथर येथे कार्यरत होते. आईचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Average 70 percent voting in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.