मोर्चातील निळ्या-पिवळ्या झेंड्यांनी वेधले लक्ष
By Admin | Updated: September 30, 2016 02:50 IST2016-09-30T02:50:45+5:302016-09-30T02:50:45+5:30
बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात निळे-पिवळे झेंडे हातात घेऊन निघालेल्या हजारो नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

मोर्चातील निळ्या-पिवळ्या झेंड्यांनी वेधले लक्ष
बसपाचे नेतृत्त्व : विविध ३६ संघटनांचा सहभाग
यवतमाळ : बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात निळे-पिवळे झेंडे हातात घेऊन निघालेल्या हजारो नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
समता मैदानावरून या मोर्चाला प्रारंंभ झाला. महात्मा फुले चौकात महात्मा जोतिबा फुलेंच्या पुतळ्याला हार्रापण करण्यात आले. नंतर पाच कंदिल चौक, नेताजी चौकमार्गे मोर्चा घोषणा देत बसस्थानक चौकात पोहोचला. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तारीक लोखंडवाला यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती-जमातीचा नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा, सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण द्यावे, बोगस आदिवासींची चौकशी करावी, मुस्लीम समाजासाठी रंगनाथन मिश्रा आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्या, मुस्लीम समाज अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा, अनुसूचित जाती-जमातींच्या वसतगिृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शैलेश गाडेकर, बसपाचे प्रदेश सचिव पंडित दिघाडे, मधुसूदन कोवे, अरविंद कुडमेथे, अरविंद कोडापे आदींनी मार्गदर्शन केले. यानंतर तारीक लोखंडवाला, पंडित दिघाडे, बाबाराव मडावींच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन सादर केले. सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. नंतर मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात आदिवासी अन्याय निवारण समिती, गोंड-गोवारी सेवा मंडळ, गोंडवाना संग्राम परिषद, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, गोंडवाना गणतंत्र पार्टी, क्रांतिवीर शामादादा कोलाम समाज संघटना, आदिवासी परधान समाज संघटना, बंजारा क्रांती दल तथा राष्ट्रीय विमुक्त महासंघ, भीम टायगर सेना, आॅल इंडिया कौमी तंजीम, आदिवासी मुक्ती दल, राष्ट्रीय मातंग महासंघ, क्रांतिवीर शामादादा कोलाम सामाजिक संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ, बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय रवीदास परिषद, गुरू रवीदास विचार मंच, बिरसा ट्रस्ट, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, आदिवासी गोवारी समाज संघटना, विदर्भ मातंग युवक संघटना, मांग गारोडी समाज जागृती मंच, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, ओबीसी क्रांतीदल, तेली समाज महासंघ, भारतीय पिछडा समाज संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, दलित-मुस्लीम आदिवासी एकता महासंघ, अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद, सम्राट अशोक ग्रुप, आदिवासी गोवारी समाज विकास कृती समिती, लोक स्वराज्य आंदोलन, कोलाम समाज युवक संघटना, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल आणि आॅल इंडिया बंजारा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
चोख पोलीस बंदोबस्त
या मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव व पियूष चव्हाण, शहरचे ठाणेदार नंदकिशोर पंत, वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोले यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाचे पहिले टोक बसस्थानक चौकात तर दुसरे टोक पोलीस ठाण्याजवळ होते. यावरून मोर्चात सहभागी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. बसस्थानक परिसरात काही काळ नागपूर, वर्धा, घाटंजी, पांढरकवडाकडे जाणारी वाहने गार्डन रोडमार्गे वळविण्यात आली होती.