केवायसीची भुरळ घालून पेन्शनवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 05:00 AM2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:17+5:30

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : बँकेतील खात्यात असलेला पैसाही आता सुरक्षित राहिलेला नसल्याचे आणखी एका प्रकरणातून पुढे ...

Attract KYC and focus on pension | केवायसीची भुरळ घालून पेन्शनवर डल्ला

केवायसीची भुरळ घालून पेन्शनवर डल्ला

Next
ठळक मुद्देनिवृत्त अभियंत्याची ऑनलाईन फसवणूक : वर्षभरात सात तक्रारी सायबर सेलकडे

सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँकेतील खात्यात असलेला पैसाही आता सुरक्षित राहिलेला नसल्याचे आणखी एका प्रकरणातून पुढे आले आहे. बँक खात्याला ‘आधार’ लिंक नसल्याने हे करण्याची प्रक्रिया करावी, अशी भुरळ घालून एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या पेन्शनमधील दीड लाख रुपयावर ठगाने डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. जिल्ह्यात आतापर्यंत अशा प्रकारचे सात गुन्हे पुढे आले आहेत. 
सेवानिवृत्त अभियंते रवींद्र नानाजी काळे (६५, अंजनेश सोसायटी, यवतमाळ) यांना शुक्रवारी दुपारी मोबाइलवर एक काॅल आला. पुढच्या व्यक्तीने तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. त्याला आधार व पॅन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे, अशी बतावणी केली. ही प्रक्रिया घरी बसूनच तुम्हाला पूर्ण करता येईल, असेही सांगितले. त्यासाठी ठगाने काळे यांना मोबाइलच्या प्ले स्टोअरमधून ‘एनी डेक्स’ हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर काही जुजबी माहिती विचारून मोबाइलला अर्धा तास हात लावू नका, अशी सूचना केली. दोन ते अडीच या अर्ध्या तासात काळे यांनी मोबाइलकडे बघितलेसुद्धा नाही. याचाच फायदा ठगाने घेत एनी डेक्स ॲपच्या माध्यमातून मोबाइलचे स्क्रीन शेअरिंग करत संपूर्ण ॲक्सेस मिळविला. ठगाने घरबसल्या रवींद्र काळे यांचा मोबाइल ऑपरेट करून बचत व पेन्शन खात्यातील रक्कम आयएफसीसीद्वारे आपल्या स्वत:च्या खात्यात टाकून घेतली. 
रवींद्र काळे यांनी ३ वाजता मोबाइल हातात घेऊन मुलाला फोन काॅलबद्दल सांगितले. वडिलांना फसविले गेल्याचे लक्षात येताच मुलाने त्यांना बँकेत जाऊन तत्काळ अकाउंट फ्रीज करण्यास सांगितले. रवींद्र काळे हे महाराष्ट्र बँकेच्या उमरसरा शाखेत पोहोचले. मात्र तेथील बँक व्यवस्थापकाने नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी करीत काळे यांना दोष देणे सुरू केले. अखेर विनंतीनंतर काळे यांचे एटीएम कार्ड ब्लाॅक केले. पेन्शन व बचत खात्याबाबत कुठलीच प्रक्रिया केली नाही. 
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता खात्यातून दीड लाख रुपये काढल्याचा मेसेज काळे यांच्या मोबाइलवर धडकला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेत जाऊन अगाऊ सूचना दिल्यानंतरही स्थानिक बँक व्यवस्थापकाकडून कुठलेही सहकार्य मिळाले नसल्याचे काळे यांचे म्हणणे असून घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी शहरातील अवधूतवाडी  पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर सेलमध्येही फसवणुकीच्या तक्रारीची प्रत दिली. 

छत्तीसगड, त्रिपुरा, बिहारमधून चालते रॅकेट
सायबर सेलकडे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या सात तक्रारी वर्षभरात आल्या आहेत. त्यापैकी तीन गुन्ह्यांतील अर्धीअधिक रक्कम परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यात ठगविणारे हे छत्तीसगड, त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांतील असल्याचे दिसून आले. त्यांना ट्रॅक करत अटकेची कारवाई करणे स्थानिक पोलिसांना शक्य होत नाही. त्यानंतरही तीन गुन्ह्यांत जवळपास पाच लाखांची रक्कम परत मिळविण्यात यश आले.

ॲपच्या माध्यमातून खात्याच्या चाव्याच चोराच्या हाती

ठगाकडून संबंधित व्यक्तीला एनी डेक्स ॲप अथवा त्यासारखे दुसरे स्क्रीन शेअरिंग ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मोबाइलवरून ओटीपी जनरेट करून परस्पर बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते. या प्रक्रियेत स्वत: बँक खातेधारकच पैसे काढून देतोय असे बँकेच्या रेकाॅर्डवर येते. दुसरीकडे खातेधारकाला आपला ओटीपी कोणी विचारला नाही त्यामुळे आपली रक्कम सुरक्षित आहे असे वाटते. प्रत्यक्षात मात्र स्वत:च्या मोबाइलच्या माध्यमातून बँक अकाउंटच्या चाव्या चोराच्या हाती दिल्यासारखाच फसवणुकीचा हा सारा प्रकार आहे. 

 

Web Title: Attract KYC and focus on pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.